कोल्ड्रिंक्समागोमाग Coca Cola चं मद्यही बाजारात विक्रीस उपलब्ध; पाहा काय आहे किंमत

Coca Cola Liquor: संपूर्ण जगभरात सॉफ्ट ड्रिंकमुळं चर्चेत असणाऱ्या कोका कोला या ब्रँडनं आता मद्यविक्रीच्या व्यवसायातही उडी घेतली आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 11, 2023, 02:06 PM IST
कोल्ड्रिंक्समागोमाग Coca Cola चं मद्यही बाजारात विक्रीस उपलब्ध; पाहा काय आहे किंमत  title=
Coca Cola sterted Liquor name lemon dou sell in india

Coca Cola Liquor: भारतात आजवर अनेक ब्रँडच्या आणि तितक्याच अनेक प्रकारच्या मद्याची विक्री केली जाते. असंख्य प्रकारच्या या मद्यविक्रीच्या व्यवसायामध्ये आता आणखी एका ब्रँडनं उडी घेतली आहे. जगभरात शीतपेयांसाठी ओळखला जाणारा हा ब्रँड म्हणजे कोका कोला (Coca Cola). कोका कोलानं भारतात मद्यविक्रीस सुरुवात केली आहे. ज्यामुळं सध्या भारतीय मद्य व्यवसायामध्ये याच ब्रँडची चर्चा सुरु आहे. 

कोका कोलाच्या मद्याच्या ब्रँडचं नाव आहे लेमन डू (Lemon Dou). सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा काही भाग आणि गोव्यामध्ये ही मद्यविक्री सुरु असून, याचा 250 मिली चा कॅन 230 रुपयांना मिळत आहे. मद्यावरून सुरु असणाऱ्या असंख्य चर्चा पाहता कंपनीकडूनही या मद्यविक्रीच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांकडून एका माध्यम समूहाला दिलेल्या माहितीनुसार सध्या लेमन डूची पायलट टेस्टींग सुरु असून, त्याबाबतीत मद्याची चव चाखणाऱ्यांच्या प्रतिक्रियाही विचारात घेतल्या जात आहेत. प्रतिक्रिया आल्यानंतरच पूर्ण स्तरावर या मद्याची विक्री करायची की नाही, याबाबतचा निर्णय कंपनीकडून घेण्यात येणार आहे. 

लेमन डूचं वेगळेपण काय? 

लेमन डू हे मद्य एक प्रकारचं अल्कोहोल मिक्स पेय असल्याचं सांगण्यात येतं. शोशु या जपानी पेयापासून ते तयार करण्यात येतं. कंपनीच्या माहितीनुसार या पेयामध्ये वोडका (Vodka) आणि ब्रँडी (Brandy) यांसारख्या डिस्टील्ड लिकरचा वापर केला जातो. सध्या या पेयाचं उत्पादन विविध ठिकाणी घेतलं जात असून, यासाठी कंपनीकडून  सॉफ्ट ड्रिंक फॅसिलिटीचा वापर केला जात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा पाहा : Demat Account सुरु केलंय? 31 डिसेंबरआधी पटापट उरका 'हे' काम, नाहीतर... 

गेल्या काही वर्षांमध्ये मद्यविक्रीच्या व्यवसायामध्ये अनेक नव्या आणि इतर विभागांमध्ये सक्रिय असणाऱ्या कंपन्यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच शीतपेयांच्या बाजारपेठांवर अधिपत्य गाजवणाऱ्या कोक आणि पेप्सी या कंपन्यांचाही समावेश आहे. एकामागोमाग या दोन्ही कंपन्या आता मद्यविक्रीच्या व्यवसायात आल्या आहेत. ज्या धर्तीवर कोका कोलाकडून त्यांच्या लेमन डू या पेयाची विक्री जपानमध्ये सुरु करण्यात आली होती. त्यामागोमाग आता भारतातही या पेयाची विक्री केली जात आहे. 

पेप्सिकोनंही अमेरिकेत त्यांच्या माउंटेन ड्यूचं अल्कोहोल वर्जन विकण्यास सुरुवात केली आहे. या पेयाला हार्ड माउंटेन ड्यू असं नावही देण्यात आलं आहे. दरम्यान, आता भारतात निवडक ठिकाणी मिळणाऱ्या कोका कोलाच्या लेमन डूला मद्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास संपूर्ण भारतात या पेयाची विक्री सुरु करण्यात येईल असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.