LPG Gas Cylender Price: दिवाळीनंतर गॅस सिलेंडरच्या दरात अचानक घसरण झाली आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी चार शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. 16 नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. चार शहरात गॅस सिलेंडर 57.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या शहरांतील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपनी IOCL कडून एक जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 16 नोव्हेंबर पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात 57.50 रुपयांची घसरण झाली आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1775.50 रुपये इतकी झाली आहे. तर मुंबईत 1728.00 रुपये असून कोलकत्तामध्ये 1885.50 रुपये आहे. तर, सर्वाधिक दर हे चेन्नई येथ असून आता 1942.00 रुपये दराने व्यावसायिक सिलेंडरची विक्री होत आहे.
दिवाळीच्या आधीच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली होती. ऐन सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरची किमंत वाढल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
ऑगस्ट महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सरकारने 30 ऑगस्ट रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत जवळपास 200 रुपयांची कपात केली होती.
घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर असून महिनाभरापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची कपात केली होती. पण आथा सरकारने या किंमतीत कोणताही बदल केलेला नाहीये. 4.20 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, मुंबईत 902.50 रुपये, कोलकात्यात 929 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.