Surgical Strike खरी की खोटी? हिंमत असेल तर व्हिडीओ प्रसिद्ध करा, भाजपाला जाहीर आव्हान

दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटलेलं असतानाचा आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीही मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंग यांच्या विधानाशी असहमती दर्शवलेली असतानाही राशीद अल्वी यांनी भाजपाला सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.   

Updated: Jan 27, 2023, 01:16 PM IST
Surgical Strike खरी की खोटी? हिंमत असेल तर व्हिडीओ प्रसिद्ध करा, भाजपाला जाहीर आव्हान

Rashid Alvi on Surgical Strike: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग (Digvijay Singh on Surgical Strike) यांनी सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित करत आधीच वाद निर्माण केलेला असताना आता आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसच्या नेत्याने पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचं आवाहन केलं आहे. राशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी हे विधान केलं असून म्हटलं आहे की "जर सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला असेल तर व्हिडीओ दाखवण्यात त्यांना काही अडचण असण्याचं कारण नाही".

"आमचा भारतीय लष्करावर विश्वास आहे, पण भाजपा सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. सरकार आपल्याकडे सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ असल्याचा दावा करत आहे. मग दिग्विजय सिंग यांनी तो व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली तर त्यात गैर काय? आम्ही पुरावे मागत नाही आहोत, पण जर सरकारचा दावा असेल तर त्यांनी व्हिडीओ दाखवायला हवा," असं राशीद अल्वी म्हणाले आहेत. 

"मी सर्जिकल स्ट्राइकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आहे. पण सत्तेत असणाऱ्यांनी जे विरोधाभास करणारे दावे केले आहेत त्यावर शंका उपस्थित करत आहे. अमित शाह यांनी वेगळे आकडे सांगितले असून, योगी आदित्यनाथ यांचे वेगळे दावे आहेत," असं राशीद अल्वी यांनी सांगितलं. काँग्रेस भारतीय लष्कराचा आदर करतं हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंग यांच्या विधानावर असहमती व्यक्त केल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "राहुल गांधी यांनीही आम्हाला सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे नकोत असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंग हेदेखील असहमत नसतील. पण प्रश्न हा आहे की, भाजपाच्या कोणत्या नेत्यांच्या विधानावर विश्वास ठेवायचा. भाजपा अशी वागत आहे, जणू काही लष्कर त्यांची संस्था आहे. लष्कर देशाचं आहे, भाजपाचं नाही".

भाजपा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. "काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते भारतीय लष्कराचा पूर्णपणे आदर करतात," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिग्विजय सिंग यांच्या विधानावरुन वाद

काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ते म्हणाले होते की "सीआरपीएफचे 40 जवान पुलवामात शहीद झाले होते. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. पण मोदींनी नकार दिला. अशी चूक कशी झाली?". आजपर्यंत पुलवामासंबंधी संसदेत कोणताही रिपोर्ट सादर करण्यात आलेला नाही. सर्जिकल स्ट्राइक केल्याचं सांगतात पण पुरावा देत नाहीत. भाजपा फक्त खोटारडेपणा करत आहे असा आरोपही त्यांनी केला. 

दिग्विजय सिंग यांचं वैयक्तिक मत - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यावेळी त्यांना दिग्विजय सिंग यांनी केलेल्या विधानासंबंधी विचारण्यात आलं होतं. त्यांनी मी त्यांच्या मताशी सहमत नसून, लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं.