Mevaram Jain : राजस्थानमधील एका बलात्कार प्रकरणात अडकलेले काँग्रेस नेते आणि बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेवाराम यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलांसोबत अश्लिल कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मेवाराम जैन असल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली ाही.
बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले. पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांनी आदेश जारी केले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून भाजपने काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले होते. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राहुल गांधी यांच्यासोबतचे मेवाराम जैन यांचे फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र, याप्रकरणी काँग्रेसकडून अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कथित अश्लील व्हिडीओची चर्चा होती, जो शुक्रवारी अचानक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. व्हिडीओमधील ही व्यक्ती 70 वर्षीय माजी आमदार आणि माजी मंत्री मेवाराम जैन असल्याचा दावा केला जात आहे. मेवाराम जैन हे सलग तीन वेळा बारमेरचे आमदार होते, मात्र या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या बंडखोर प्रियांका चौधरीकडून पराभव झाला. त्याआधी एका महिलेने मेवराम यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. मेवाराम जैन यांच्याविरोधात जोधपूरच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करताना एका विवाहित महिलेने दोन अश्लील व्हिडिओंचा उल्लेख केला होता.
पीडित महिलेने मेवाराम जैन आणि आरपीएस आनंद सिंह राजपुरोहित यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेवाराम जैन याने मला आपली मुलगी म्हटले होते. पण परिस्थितीचा फायदा घेत त्याने माझ्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने माझ्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. जेव्हा तिच्यावर बलात्कार करून कंटाळला तेव्हा त्याने 15-16 वर्षांच्या मुलींना आणण्याची मागणी केली होती, असेही महिलेने तक्रारीत म्हटलं होतं.
दरम्यान, आता हे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असा दावा केला जात आहे की हा तोच व्हिडिओ आहे ज्याचा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला होता आणि व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मेवाराम जैन आहे. झी 24 तास या व्हिडिओला दुजोरा देत नाही. या प्रकरणी मेवाराम जैन यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.