सरकारला कामं नाहीत का, माझ्या मुलांचं Instagram ही हॅक करताहेत; प्रियंका गांधी कडाडल्या

धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. 

Updated: Dec 21, 2021, 05:27 PM IST
सरकारला कामं नाहीत का, माझ्या मुलांचं Instagram ही हॅक करताहेत; प्रियंका गांधी कडाडल्या  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या आधी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. यातच प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील सत्ताधाऱ्यांवर काही गंभीर आरोप लावले आहेत. आपल्या मुलांचे सोशल मीडिया अकाऊंटही हॅक केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. 

सरकारला काही कामं नाहीत का? असा खडा सवालही त्यांनी केला आहे. 

फोन टॅपिंग आणि इनकम टॅक्स विभागाच्या धाडींबाबरत प्रियंका यांना माध्यमांनी काही प्रश्न केले.

माध्यमांच्या प्रश्नांचं उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या, 'फोन टॅपिंग सोडा, इथे माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केले जात आहे. या सरकारला काहीच काम नाही का?'

सध्या उत्तर प्रदेशात फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दावा केल्यानुसार त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. 

सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपलं बोलणं ऐकतात असाही दावा त्यांनी केला. सध्याचं सरकार किती निष्क्रिय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी प्रयागराज येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सशक्तीकरण संमेलनावरही निशाणा साधला. 

'लडकी हूँ, लढ सकती हूँ' या काँग्रेसच्या मोहिमेमुळे पंतप्रधानांना सध्या महिलांसाठी काम करावं लागत आहे. 

महिलांच्या एकीपुढे पंतप्रधानांनाही नमतं घ्यावं लागलं आहे हा उत्तर प्रदेशातील महिलांचा विजय आहे. चहूबाजुंनी भाजप सरकारला निशाण्यावर धरत प्रियंका गांधी यांनी शाब्दिक वार केल्याचं पाहायला मिळालं.