'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

Updated: Mar 15, 2020, 12:22 PM IST
'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'

जयपूर: मध्य प्रदेश विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर मध्य प्रदेशातील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना खबरदारी म्हणून राज्याबाहेर हलवले होते. यापैकी काँग्रेसचे आमदार रविवारी हरिश रावत यांच्यासोबत भोपाळमध्ये परतले. 

यावेळी हरिश रावत यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आम्ही उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला त्याची बिलकूल चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे त्यांनी म्हटले. 

मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी

यावेळी त्यांना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर काँग्रेस आमदारांविषयी विचारण्यात आले असता रावत यांनी सर्व बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. काँग्रेस आणि भाजपकडून सोमवारी विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी आपापल्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. 

मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक, बसपाचे दोन आणि चार अपक्ष आमदार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.