close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार?

सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामींना द्यावा लागणार राजीनामा ?

Updated: Jul 22, 2019, 11:31 AM IST
सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार?

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. पण याआधी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांचा दावा आहे की, जेडीएस सरकार वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यासाठी तयार आहे. इतकंच नाही तर एचडी कुमारस्वामी यांचा पक्ष काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी देखील तयार आहेत.

डीके शिवकुमार यांनी म्हटलं की, त्यांनी जेडीएसच्या प्रमुख नेत्यांसोबत याबाबतीत चर्चा केली आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या आधी शिवकुमार यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

विधानसभेत आज जर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बंडखोर आमदार हे सरकारच्या बाजुने मतदान नाही करणार तर कुमारस्वामी यांच्या सरकारचा आज शेवटचा दिवस असेल. काँग्रेस आणि जेडीएस सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना जर काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असेल तर ते सरकार वाचवू शकतील पण कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागणार आहे.

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी यांचं सरकार संकटात आलं आहे. सिद्धरमैया हे जर मुख्यमंत्री होत असतील तर 4 बंडखोर आमदार हे आपला राजीनामा मागे घेऊ शकतात. सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारकडे 100 आमदार आहेत. पण त्यांच्याकडे बहुमत नाही. पण जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर काही आमदार सरकारच्या बाजुने मत देण्याची शक्यता आहे.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. पण बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नव्हता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएस बिनशर्त पाठिंबा जाहीर करुन टाकला होता. पण त्यानंतर ही दोन्ही पक्षामध्ये वाद सुरुच होते. काँग्रेस आमदार हे आमचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हेच आहेत असं उघडपणे बोलत होते.