Hotel Room Booking Precaution: वर्ष संपायला आलंय. काही दिवसात नववर्षाचं स्वागत केलं जाईल. प्रत्येकाने कुठे ना कुठे जायचा प्लान नक्की केला असेल. सुट्टीसाठी किंवा बिझनेस ट्रीपसाठी हॉटेल्स बुकींग करणं खूप सामान्य झालंय. पण रूम बुकिंग करताना तुमची छोटीशी चूक खूप मोठे नुकसान करू शकते. बनावट वेबसाइट्स, प्रचंड सवलत आणि कागदपत्रांची चुकीची मागणी यासारखे घोटाळे हॉटेल इंडस्ट्रीत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे हॉटेल बुकींग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहतील? याबद्दल जाणून घ्या.
हॉटेल्समध्ये चेक-इन करताना अनेकदा आधार कार्ड ओळखपत्रासाठी मागितले जाते. तुमच्या ओळख पटवून देण्यासाठी हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण काऊंटरवर तुमचे मूळ आधार कार्ड दाखवणे टाळा. कारण आधार तुमच्या बँक खात्याशी आणि इतर तपशीलांशी जोडलेले असते. ते चुकीच्या हातात गेल्यास फसवणूक होऊ शकते. त्याऐवजी मास्क्ड आधार कार्ड वापरा. यामुळे आधार कार्ड सुरक्षित राहते. ज्यामध्ये आधार कार्डवरील फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. बाकीचे क्रमांक लपवलेले असतात. मास्क केलेले आधार ओळखण्यासाठी वैध मानले गेले आहे.
हॉटेल्सचे ऑनलाइन बुकिंग करताना सवलतीच्या ऑफरच्या मोहात पडू नका. अनेक बनावट वेबसाइट्स आणि स्कॅमर मोठ्या सवलतीचे आश्वासन देऊन तुमचे बँक तपशील चोरू शकतात. अंदमानमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका व्यक्तीने हॉटेल बुकिंग दरम्यान 6.1 लाख रुपये गमावले. क्रेडिट कार्डवर 10% सूट देण्याचे आमिष दाखवून स्कॅमर्सनी लोकांचे तपशील चोरले.
ऑनलाइन बुकिंगसाठी नेहमी व्हेरिफाइड आणि विश्वासार्ह पोर्टलवर जा. अज्ञात वेबसाइट आणि फिशिंग ईमेलवर क्लिक करणे टाळा.
हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे वैध फोटो आयडी असणे आवश्यक आहे. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी, पासपोर्ट किंवा मास्क केलेले आधार वापरू शकता.
आयडी प्रूफ देताना तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. मास्क केलेले आधार कार्ड किंवा इतर पर्याय जसे की मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी वापरा.
हॉटेल बुकिंगच्या वेळी, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील फक्त व्हेरिफाइड आणि विश्वसनीय वेबसाइटवर शेअर करा.
कोणत्याही ईमेल, मेसेज किंवा कॉलद्वारे येणाऱ्या बनावट ऑफरवर विश्वास ठेवू नका.
बँकेच्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट किंवा मोबाइल ॲप्स वापरा, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही अनधिकृत व्यवहाराची त्वरित माहिती मिळू शकेल.
ऑनलाइन बुकिंग करताना फक्त तुमचे स्वतःचे नेटवर्क वापरा आणि सुरक्षित आणि सार्वजनिक वायफाय टाळा.
प्रवासात हॉटेल बुक करताना ही छोटी खबरदारी घेतल्यास मोठ्या आर्थिक नुकसानापासून वाचू शकते. तुमचा कष्टाचा पैसा तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. तो फसवणूक करणाऱ्यांच्या हाती पडू देऊ नका. सतर्क राहा, हुशार व्हा आणि तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल सुरक्षित करा.