जगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य'

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं.

Updated: Jun 28, 2018, 05:51 PM IST
जगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य' title=

मुंबई : थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं. या रिपोर्टचे पडसाद भारतामध्येही उमटले. अफगाणिस्तान आणि सिरियापेक्षाही भारत महिलांसाठी असुरक्षित असल्याचं दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. या यादीमध्ये भारत पहिल्या, अफगाणिस्तान दुसऱ्या आणि सिरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणाबद्दलची नवी माहिती आता समोर आली आहे. महिला प्रश्नांबद्दल तज्ज्ञ असणाऱ्या ५५० जणांची मतं या सर्वेक्षणामध्ये घेण्यात आली आहेत. ५५० पैकी ५४८ जणांची मत ऑनलाईन, फोनवर आणि भेटून घेण्यात आली. २६ मार्च ते ४ मेदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

'देशाला बदनाम करण्याचं षडयंत्र'

हे सर्वेक्षण म्हणजे देशाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय महिला आयोगानं केला आहे. सरकारनं काही एनजीओंवर कारवाई केली आणि एनजीओंना काळ्या यादीत टाकलं त्यामुळे अशाप्रकारचे रिपोर्ट समोर आल्याचं महिला आयोगाच्या कार्यवाहक अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या. हा रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात फेकण्याच्या लायकीचा आहे. या सर्वेक्षणावर चर्चा करून वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही. दुष्प्रचार करण्यासाठी हा रिपोर्ट तयार करण्यात आल्याचं वक्तव्य रेखा शर्मा यांनी केलं.

या रिपोर्टला मीडियामध्ये महत्त्व दिलं गेल्याचंही शर्मा म्हणाल्या. कठुआ आणि उन्ना बलात्कार प्रकरण ताजं असताना हे सर्वेक्षण करण्यात आलं. या वेळेबाबतही शर्मांनी प्रश्न उपस्थित केले.