पोलिसांनीच एका 22 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी गेली असता या धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 16 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मुलगी गाजियाबादमधील साई उपवन सिटी फॉरेस्ट येथे गेली असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा लैंगिक छळ केला. यावेळी आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्याने साधे कपडे घातले होते. तिघेजण पोलिसांच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी जोडप्याकडून 10 हजार रुपयांची लाच मागितली.
तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 28 सप्टेंबरला कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिच्या होणाऱ्या पतीला कानाखाली लगावली. तसंच त्यांनी तिच्या गुप्तांगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसंच हा सगळा प्रकार घडल्यानंतरही आरोपी पोलीस कर्मचारी तिला फोन करत होते. तसंच रात्री उशिरा तिच्या घराबाहेर आले होते.
तरुणीने पोलिसांच्या आपातकालीन क्रमांकावर फोन करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि तक्रार केली. दिल्ली पोलिसांनी हा फोन कॉल गाजियाबाद पोलिसांकडे पाठवला.
तिन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे. कॉन्स्टेबल राकेश कुमार, होमगार्ड दिगंबर अशी दोघांची नावं आहेत. याशिवाय आणखी एका अज्ञात व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिला आणि तिच्या होणाऱ्या पतीला आरोपी पोलिसांनी ओलीस ठेवलं होतं. तब्बल तीन तास ते छळ करत होते. आरोपी पोलीस छळ करत असताना जोडप्याने त्यांना 1000 रुपयेही दिले.
"दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिघे पीआरव्हीमधून आले आणि आम्हाला धमकावू लागले. त्यांनी माझ्या होणाऱ्या पतीला कानाखाली लगावली. त्यांच्यातील एकाने माझ्याकडे 10 हजार रुपये मागितले. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडले. त्यांच्या पायाही पडलो पण त्यांनी ऐकलं नाही. यानंतर राकेश कुमार हा अत्यंत वाईट पद्धतीने वागू लागला. शरीरसंबंध ठेवण्यासाठी तो माझ्यावर जबरदस्ती करु लागला. तिसऱ्या व्यक्तीनेही आमच्याकडे 5.5 लाखांची मागणी केली. आम्ही तीन तास त्यांच्या ताब्यात होतो. यावेळी आरोपी वारंवार मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते," असं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींवर कलम 354अ (1)(ii) लैंगिक छळ आणि लैंगिक इच्छेची मागणी, 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 504 (जाणूनबुजून अपमान) आणि 342 (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गाझियाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर राकेश कुमारवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच दिगंबरच्या विभागाला कारवाईसाठी पत्र पाठवलं आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत.