100 रुपयाचं हॅमर, 1300 रुपयांचं डिस्क कटर अन्...; एकट्याने फोडलं ज्वेलरी शोरुम; पोलीसही हादरले, धक्कादायक खुलासे

दिल्लीमधील जगनपुरात परिसरात ज्लेवरी शॉपमध्ये झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या लोकेश या तरुणाने एकट्याने दिल्लीमधील सर्वात मोठी चोरी केली.   

शिवराज यादव | Updated: Oct 1, 2023, 05:44 PM IST
100 रुपयाचं हॅमर, 1300 रुपयांचं डिस्क कटर अन्...; एकट्याने फोडलं ज्वेलरी शोरुम; पोलीसही हादरले, धक्कादायक खुलासे  title=

दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली असल्याने खळबळ उडाली आहे. भिंती फोडून चोरांनी अख्खं शोरुम लुटून नेलं होतं. पोलिसांनी या चोरीमधील मास्टरमाइंडला अटक केली आहे. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक खुलासे झाले आहेत. या चोरीसाठी चांदणी चौकातून खरेदी केलेला 100 रुपयांचा हातोडा, स्क्रू ड्रायव्हर्स आणि प्लायर्स टूलबॉक्स यांचा वापर करण्यात आला होता. छत्तीसगडच्या लोकेश या तरुणाने एकट्याने दिल्लीमधील हा दरोडा टाकला होता. राजधानी दिल्लीमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमार करण्यासाठी लोकेशने दिल्लीत दोन शोध मोहीम राबवल्या होत्या. पहिली मोहीम 9 सप्टेंबर आणि दुसरी 17 सप्टेंबर रोजी आखण्यात आली होती. दिल्लीच्या विविध भागातून त्याने साधनं विकत घेतली होती. चांदणी चौकातून 100 रुपयांचा हातोडा आणि जीबी रोडवरून 1300 रुपयांचा डिस्क कटर खरेदी करण्यात आला होता. त्याने घरून स्क्रू ड्रायव्हर आणि पक्कड आणली होती. 

चादर, बॅग, पोती....जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; छापा टाकल्यानंतर पोलीस हादरले; चोरांनी अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

 

रविवारी 11 वाजता लोकेश हा घराला लागून असणाऱ्या उमराव ज्वेलर्सच्या आत शिरला. तो रात्रभर तिथेच होता. यावेळी त्याने तिथे प्रदर्शनासाठी लावलेले सर्व दागिने चोरले आणि नंतर नंतर स्ट्राँगरुमच्या दिशेने वळला. सीसीटीव्ही कॅमेरा बंद करणं आणि स्ट्राँगरुममध्ये घुसणं या दोन गोष्टी यावेळी फार आव्हानात्मक होत्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश हा छतावरुन चारमजली इमारतीत शिरला. यानंतर त्याने तळघर गाठलं जिथे स्ट्राँगरुम होती. त्याने स्ट्राँगरुमच्या भिंतीला ड्रिल करत खड्डा पाडला. यामुळे त्याला आतमध्ये ठेवलेले दागिने मिळाले. ज्वेलरी शॉपमध्ये लावण्यात आलेले दागिनेही त्याने लुटले. 

लोकेशला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली असून तो सध्या बिलासपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. लोकेश इतकी मोठी चोरी केल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देण्याच्या तयारी होती. पण पोलिसांना एका चोराकडूनच एक मोठा दरोडा टाकून एक व्यक्ती बिलासपूरला परत आल्याची माहिती मिळाली आणि लोकेश हाती लागला. 

लोकेश हा 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान चांदणी चौकातील राजधानी गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होता. त्याचा फोन ट्रॅक करण्यात आला असता चोरीच्या दुसऱ्या दिवशी तो काश्मीर गेट आयएसबीटी येथे होता हे समोर आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याने रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी तिकीट खरेदी केल्याचं दिसलं. यावेळी त्याच्या हातात दोन मोठ्या बॅगा होत्या. दिल्ली पोलीस गुरुवारी बिलासपूर येथे पोहोचले आणि लोकेशला त्याच्या भाड्याच्या घऱातून अटक केली.