आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला पण,  भाऊ फोन करुन थकले... 14 वर्षांनी घरी परतलेल्या रमेशचा ओडिशात मृत्यू

Odisha Train Accident : ओडिसात झालेल्या भीषण अपघातात 261 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या 261 जणांमध्ये प्रत्येकाची एक हृदयद्रावक गोष्ट समोर येत आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केलेली असली तरी ती व्यक्ती पुन्हा येणार नसल्याने कुटुंबियांना आपलं दुःख आवरता येत नाहीये.

आकाश नेटके | Updated: Jun 3, 2023, 05:41 PM IST
आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला पण,  भाऊ फोन करुन थकले... 14 वर्षांनी घरी परतलेल्या रमेशचा ओडिशात मृत्यू title=
(फोटो सौजन्य - PTI)

Coromandel Express Accident : ओडिशाच्या बालासोर (Odisha Train Accident) येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 261 लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे 900 लोक जखमी झालेत. बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी बहनगा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandel Express) आणि बेंगळुरू-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरून मालगाडीला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. बचाव कार्य पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे.

मात्र या अपघातामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. या अपघातानंतर दोन्ही ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृतांचा खच पडला आहे. अनेक जण आपल्या घरातील व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याच अपघातात एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे. हा तरुण 14 वर्षांनी आपल्या गावी गेला होता मात्र तिथून परतत असतानाच तासाभरात काळाने त्याच्यावर घाला घातला.

या अपघातात दोन भाऊ त्यांच्या रमेश नावाच्या भावाला शोधत आहेत. रमेशचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रमेश कामानिमित्त चेन्नईमध्ये राहत होता. पण तो बालासोर जिल्ह्यातील सोरो भागातील रहिवासी होता. आईचे निधन झाल्याचे कळताच तो तब्बल 14 वर्षांनी तो गावी परतला होता. आईच्या अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी पार पाडल्यानंतर तो चेन्नईला परतत होता. यासाठी बालासोर येथून रमेशने शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता कोरोमंडल एक्सप्रेस पकडली आणि तो चेन्नईला रवाना झाले. मात्र संध्याकाळी 7 वाजताच या ट्रेनचा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रमेशच्या दोन्ही भावांनी त्याच्याशी मोबाईवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र रमेश फोन उचलत नव्हता.

शेवटी 12.30 च्या सुमारास त्यांनी पुन्हा फोन केला तेव्हा एका व्यक्तीने फोन उचलला आणि रमेशचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. यानंतर दोन्ही भावांनी घाईघाईने हॉस्पिटल गाठले आणि भावाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र रमेशचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये तिन्ही भावांचा मृत्यू

कोरोमंडल एक्सप्रेस अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही भाऊ होते. पश्चिम बंगालमधील बसंती, दक्षिण 24 परगणा येथील रहिवासी हरण गायन, निशिकांत गायन, दिबाकर गायन हे तिघेही भाऊ मजूर म्हणून काम करायचे आणि भात लावणीसाठी आंध्र प्रदेशात जात होते. भात लावण्यासाठी ते यापूर्वीही अनेकदा आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र यावेळी जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.