Elon Musk: एलॉन मस्क हे जगभरात चर्चेत असणारं नाव आहे. एक्स म्हणजेच आधीचे ट्विटर त्यांनी विकत घेतले. यानंतर ब्लू टीकसाठी पैसे भरण्याची अट त्यांनी यूजर्ससमोर ठेवली. सध्या एलॉन मस्क अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत आहेत. 5 नोव्हेंबरला अमेरिकेची निवडणूक होतेय. दरम्यान एलॉन मस्कची कंपनी एक्समध्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एक्स कंपनीतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने द वर्जने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कंपनीच्या इंजिनीअरिंग विभागातून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. यात किती कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडली? याबद्दल ठोस माहिती नाही. पण कर्मचारी कपातीच्या ठिक 2 महिने आधी तुमच्या कामाची वर्कशिट टीम लीडरकडे सुपूर्द करा, असे त्यांना सांगण्यात आले होते.
कर्मचारी कपातीसंदर्भात कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पण लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अलीकडेच एलोन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. आपल्या बहुप्रतिक्षित स्टॉक अनुदानाबद्दल एक्सच्या कर्मचाऱ्यांना ईमेल केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कर्मचाऱ्यांवर पडणाऱ्या प्रभावाच्या आधारे स्टॉक पर्याय मंजूर करण्याची योजना आखली आहे.
कर्मचाऱ्यांना आपला स्टॉक मिळवण्यासाठी कंपनीत आपल्या योगदानाबद्दल एक पानाचा सारांश आपल्या टीम लीडरकडे द्यावा लागेल. मस्कने 2022 मध्ये X विकत घेतले.त्यावेळी त्याने कंपनीतील सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले. कंपनीतील 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आल्याने एलॉन मस्क जगभरात चर्चेचा विषय बनले होते.
एलॉन मस्क यांनी केलेल्या कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या अनेक विभागांवर परिणाम झाला. ज्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डिझाइन यावर परिणाम झाला. कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन टीममधील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले. यावर्षी जानेवारीमध्ये, X ने त्याच्या 1,000 सेफ्टी स्टाफला कामावरुन काढून टाकले होते. हे कर्मचारी वादग्रस्त ऑनलाइन कंटेट थांबवण्याचे काम करायचे. यामध्ये 80 टक्के सॉफ्टवेअर इंजिनीअर होते. जे 'ट्रस्ट आणि सेफ्टी इश्यू'वर काम करायचे.