नवी दिल्ली: केंद्र सरकारने12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी शनिवारी एडवायजरी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत या राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. ज्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे अशा राज्यांसाठी ही एडवायजरी आहे.
कोणतेही निर्बंध नसतील तर एक संक्रमित व्यक्ती 30 दिवसात सरासरी 406 जणांना संक्रमित करू शकते असे केंद्र सरकारने म्हटले आहे. मे २०२० पासून कोविड 19 संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.
46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण केसपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणा मृत्यूंपैकी 69% केस नोंदविण्यात आले. 'महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संक्रमण झाले आहे. गेल्या आठवड्यात देशात नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीतील 59.8 % रुग्ण इथे सापडले.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) यांची उच्च स्तरीय बैठक झाली. यामध्ये कोरोना प्रभावित 46 जिल्ह्यांतील महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी देखील उपस्थित होते. ही 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार यांचा यात समावेश आहे.
या बैठकीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बाधित जिल्ह्यांचे विश्लेषण आणि काही महत्त्वपूर्ण सांख्यिकीय आकडेवारी सादर करण्यात आली. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 90 टक्के हून जास्त केसेस या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहे. 90 टक्के जणांना या आजाराबद्दल माहिती आहे. तर केवळ 44 टक्के जण मास्कचा वापर करतात. "जर एखाद्या पॉझिटीव्ह व्यक्तीवर निर्बंध घातले नाहीत तर 30 दिवसात ती व्यक्ती 406 लोकांना संक्रमित करू शकते असे आरोग्य विभागाने म्हटले.