Coronavirus Update : कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन आजपासून उपलब्ध होणार आहे. (Coronavirus News) कोविन प्लॅटफॉर्मवर नेझल व्हॅक्सिन दिसेल. बूस्टर डोस म्हणून नेझल व्हॅक्सिन घेता येणार आहे. एवढंच नाही तर याआधी तुम्ही कोणतीही म्हणजे कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन स्पुटनिक कोणतीही लस घेतली असली तरी तुम्ही बूस्टर डोस म्हणून नेझल व्हॅक्सिन घेऊ शकता. मात्र नेझल व्हॅक्सिनचा डोस मोफत नसेल. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळलेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जातेय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावलीय. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
कोरोनाचा नवा व्हेरियंट उघड झाल्यावर आता बूस्टर डोससाठी गर्दी वाढली आहे. कोविनवर बूस्टर डोस घेण्यासाठी वेगाने रजिस्ट्रेशन सुरु आहे. गुरूवारी 7 वाजेपर्यंत बूस्टर घेण्यासाठी12 हजारहून अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केलं. गेल्या 27 दिवसांत 50 हजारहून अधिक जणांनी बूस्टर डोस घेतला. दरम्यान, मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता कमीच आहे. अशी सूत्रांची माहिती आहे. कोरोनाबाबत लोकांमध्ये पुरेशी जनजागृती झालीय. त्यामुळे केवळ नियमावली जारी केली जाईल. एअरपोर्टवर प्रवाशांचे सम्पल्स घेऊन त्यांना थांबवलं जाणार नाही, त्यांना सोडून दिलं जाईल.
इंग्लंडमध्ये एकीकडे कोरोनाची साथ असतानाच आणखी एक ताप चिंता वाढवतोय. इंग्लंडमध्ये स्कारलेट नावाचा एक ताप थैमान घालतोय. ५ ते १५ या वयोगटातल्या मुलांना सर्वाधिक बाधा होतेय. इंग्लंडमध्ये या तापाने 94 बळी घेतलेत. त्यात 21 लहान मुलांचाही मृत्यू झालाय. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत तब्बल २७ हजार मुलांना याची बाधा झालीय. स्कारलेट नावाचा हा ताप भारतात लाल ताप नावाने ओळखला जातो. त्याचा इंग्लंडमध्ये उद्रेक झालाय. बॅक्टेरियामुळे हा ताप येतो. घशाला सूज येणे आणि तीव्र ताप अशी त्याची लक्षणं आहेत. घशात लाल रंगाचं पुरळ येतं, तर रूग्णाच्या अंगावर रॅशेस येतात. ५ ते १५ या वयोगटातल्या मुलांसाठी हा ताप अत्यंत धोकादायक सांगितला जातोय.
चीनमध्ये कोरोनाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उद्रेक झालाय. चीनमध्ये दिवसाला जवळपास १० लाख लोकांना कोरोनाची लागण होतेय. तर जवळपास ५००० जणांचा कोरोनामुळे प्रत्येक दिवसाला बळी जातोय. ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारीत कोरोनाची लागण होणा-यांची दैनंदिन संख्या 37 लाखांपर्यंत जाण्याची भीती आहे. तर मार्चमध्ये तब्बल 42 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. एकीकडे चीनमध्ये हॉस्पिटलं ओसंडून वाहात आहेत. दफनभूमीत रांगा लागल्या आहेत तर चीन सरकार मात्र खोटी आकडेवारी जाहीर करण्यात मग्न आहे.