COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 24, 2023, 06:48 AM IST
COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण  title=

COVID-19 Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना थैमान घालणार का अशी भिती सतावू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 752 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. शुक्रवारच्या तुलनेत रूग्णसंख्येचं हे प्रमाण दुप्पट आहे. 21 मे 2023 नंतर देशात एकाच दिवसात कोरोनच्या संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. देशात गेल्या 24 तासात संसर्गामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याने या साथीच्या आजारामुळे मृतांची संख्या 5,33,332 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या कोरोनातून बरं झालेल्या लोकांची संख्या 4,44,71,212 झाली आहे. तर कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

राज्यात देखील वाढतोय कोरोनाचा धोका

राज्यात देखील कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येतेय. सध्या राज्यात 103 सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी  राज्यात 35 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशातच सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नव्याने रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाने पुन्हा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचे काम सुरू केलंय.

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  या टास्क फोर्सच्या सदस्यपदी 17 पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता आहे.  आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप  मैहसेकर, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह या फोर्समध्ये सदस्य म्हणून असतील.