नवी दिल्ली : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ९७९ रुग्ण झाले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. परदेशातून मास्क आणि व्हॅन्टिलेटर मागवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
मागच्या २४ तासात कोरोनाचे १०६ नवे रुग्ण आढळले आहेत. सगळ्या राज्यांशी बोलणं झालेलं आहे. कोरोनाचे रुग्ण आणि इतरांमध्ये अंतर ठेवायला सांगितलं आहे, असं लव अग्रवाल म्हणाले.
व्हॅन्टिलेटर आणि मास्कची निर्मिती करण्यावर जोर दिला जात आहे. तसंच कॅबिनेट सेक्रेटरींनी राज्यांसोबत बैठक घेतली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आज १० सशक्त समूह बनवण्यात आले आहेत. या ग्रुपचं लक्ष मेडिकल इमर्जन्सी, बेड, उपचारांसाठीची उपकरणं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर असेल, असं वक्तव्य संयुक्त सचिवांनी केलं.
आज जवळपास ३५ हजार जणांची तपासणी झाली आहे. लॅबची संख्या वाढवण्यात आली आहे. आयसीएमआरचे ११३ लॅब आहेत, तर ४७ खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे डॉक्टर गंगाखेडकर यांनी दिली.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९६ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि ठाणेमध्ये १०७, पुण्यात ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १, बुलढाणा १ अशी रुग्णांची संख्या आहे. यापैकी मुंबईतले १४, पुण्याचे १५, नागपूरचा १, औरंगाबादचा १ आणि यवतमाळचे ३ अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज दिला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.