पंतप्रधानांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सला हे मुख्यमंत्री गैरहजर

कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

Updated: Apr 27, 2020, 04:20 PM IST
पंतप्रधानांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सला हे मुख्यमंत्री गैरहजर title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या या बैठकीला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन गैरहजर होते. आजच्या बैठकीमध्ये विजयन यांना बोलायला वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे विजयन यांच्याऐवजी केरळ राज्याचे मुख्य सचिव टॉम जोस यांनी बैठकीला हजेरी लावली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ राज्याने आपलं मत पंतप्रधानांना लिहून कळवलं आहे. मागच्यावेळी जेव्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात संवाद झाला होता, तेव्हा विजयन यांना बोलायची संधी मिळाली होती. तर आज ज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मागच्यावेळी बोलायला मिळालं नव्हतं, त्यांना यंदा पंतप्रधानांपुढे आपलं म्हणणं मांडायला सांगण्यात आलं होतं.

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा होती. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे प्रतिनिधी म्हणून मुख्य सचिवांना पाठवतील, असं बोललं जात होतं. पण अखेर ममता बॅनर्जी या बैठकीला आल्या. मोठ्या राज्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याचाचा आरोप करत ममता बॅनर्जी नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. लॉकडाऊनबाबत जर निर्णय घ्यायचा असेल, तर मोठ्या राज्यांचं मत विचारात घ्यायलाच हवं, असं ममतांना वाटत असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्राने सांगितलं.

ममता बॅनर्जींना या बैठकीत बोलण्याची संधी मिळणार नव्हती, तरीही त्या बैठकीला उपस्थित राहिल्या. ३ मे रोजी देशातला लॉकडाऊन संपत आहे, त्याआधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. याआधीही पंतप्रधानांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा संवाद साधला होता.  

ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, तिकडे लॉकडाऊन सुरूच राहिल, असं पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले. तसंच अनेक राज्य ही लॉकडाऊन वाढवण्याच्या मताची असल्याचंही या बैठकीत समोर आलं. लॉकडाऊन उघडण्याबाबत राज्य सरकारांनी धोरण तयार करावं. राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार निर्णय घ्यावा, असं पंतप्रधान म्हणाले.