AC वापरण्याबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; जाणून घ्या किती असलं पाहिजे खोलीचं तापमान

देशाच्या सद्यस्थितीत लोकांच्या मनात अशा शंका आहेत

Updated: Apr 26, 2020, 11:16 AM IST
AC वापरण्याबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; जाणून घ्या किती असलं पाहिजे खोलीचं तापमान title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव आणि सतत वाढणारं तापमान लक्षात घेता सरकारने निवासी भागात, रुग्णालयं आणि कार्यालयांमध्ये एसी  air conditioner वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. एसी, खोलीच्या मध्यभागी हवेचं पुनः परिसंचरण करुन म्हणजेच हवा पसरवून (री-सर्कुलेट)  पुन्हा थंड करण्याच्या नियमावर काम करतो.

देशाच्या सद्यस्थितीत लोकांच्या मनात अशा शंका आहेत की मॉल, कार्यालयं, रुग्णालयं इत्यादी ठिकाणी एसीचा वापर केल्यास कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढू शकतो.

सरकारकडून एसी वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खोलीचं तापमान 24 डिग्री सेल्सियस ते 30 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तर आद्रतेचा स्तर (Humidity) 40 ते 70 टक्क्यांपर्यंत असला पाहिजे. फिल्टर स्वच्छ ठेवण्यासाठी एसीची वेळोवेळी दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय घरांत सतत ताजी हवा येण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी एग्जॉस्ट फॅन असणं आवश्यक आहे.

मार्गदर्शनक सूचनेनुसार, घरातील खोल्यांमध्ये एसीच्या थंड हवेसह काहीशी खिडकीही खुली करावी. शिवाय एग्जॉस्ट फॅनद्वारा बाहेरील हवादेखील आत आली पाहिजे. त्यामुळे नैसर्गिक फिलट्रेशन होऊ शकेल.

इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजेटिंग ऍन्ड एअर कंडिशन इंजिनियर्स (ISHRAE) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्द्र हवामानात तापमान 24 डिग्री सेल्सियसपर्यंत असलं पाहिजे. तर कोरड्या हवामानात आर्द्रता काढून टाकली पाहिजे. तापमान 30 डिग्री सेल्सियसपर्यंत असलं पाहिजे. हवेची गती टिकवून ठेवण्यासाठी पंख्याचा वापर करणं महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD), देशभरातील केंद्र सरकारच्या इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एसीबाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचं पालन करण्यास सांगितलं आहे.