CoronaVirusमुळे चलनी नोटांबाबत SBIच्या सूचना

कागदी नोटांमुळेही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे.

Updated: Mar 23, 2020, 05:19 PM IST
CoronaVirusमुळे चलनी नोटांबाबत SBIच्या सूचना
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात वेगाने वाढत आहेत. अशात स्वत:ला सुरक्षित ठेवणं अधिक गरजेचं आहे. हीच बाब लक्षात घेता, एसबीआय रिसर्चने  (SBI Research) सरकारला, देशात कागदी नोटांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात पेपर करन्सी नोटांऐवजी पॉलिमर करन्सी नोटांचा (Polymer Currency Notes) वापर करण्याबाबत सुचवलं आहे. त्यासोबतच अधिकाधिक डिजिटल ट्रान्झक्शनच्या वापरावरही भर देण्यात यावा याबाबतही सांगितलं आहे. 

'या' देशांत पॉलिमर करन्सीचा वापर -

पॉलिमर करन्सी सिंथेटिक पॉलिमरपासून बनवली जाते. याला बायएक्सियली ओरिएंटेड पॉलिप्रोपाइलीन (बीओपीपी) असंही म्हटलं जातं. कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर करन्सी अधिक टिकाऊ असते. सध्या कॅनडा, यूके, नायजेरिया, मालदिव, मॉरिशस यांसारख्या देशात या करन्सीचा वापर केला जातो.

यूपीआयचा (UPI) वापर -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून डिजिटल ट्रान्झक्शनच्या वापरावर अधिक भर देण्याचं  सांगण्यात येत आहे. लोकांनी संपर्कात न येणारे पेमेन्ट सिस्टम UPI, IMPS, RTGS, मोबाइल वॉलेट आणि नेट बँकिंगचा वापर करणं गरजेचं आहे. संपर्क येत नसलेल्या पेमेन्ट सिस्टमचा अवलंब केल्यामुळे 'कॉन्टॅक्ट बेस पेमेन्ट'द्वारे कोरोना व्हायसरचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.

CAITच्या सूचना -

सीएआयटीचे (Confederation Of All India Traders) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी भारतीय आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी पंतप्रधानांना, कागदापासून बनलेल्या नोटांमुळे महामारी ठरत असलेला कोरोना व्हायरस पसरण्यास कारणीभूत ठरु शकत असल्याचं सांगितलं.

17 मार्च 2020  रोजी ‘इकोरॅप’ अहवालात एसबीआय रिसर्चने सांगितलं की, रोख रकमेचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे. भारतातील कागदी नोटांमुळे कोणत्याही व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित पाऊलं उचलली गेली पाहिजेत. यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांनी करन्सीच्या माध्यमातून संसर्ग पसरविण्याचा धोका कमी करण्यासाठी पॉलिमर नोटांचा वापर केला आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने, सिंथेटिक पॉलिमरपासून बनवलेल्या चलनी नोटा आणण्याचा विचार केला पाहिजे, त्यामुळे कागदी नोटांच्या तुलनेत संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकत असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.