...म्हणून स्मशानभूमीत लावावे लागले 'फालतू बैठना मना है' चे बोर्ड; पोलीसही हैराण

Cremation Place Board: या स्मशानभूमीच्या व्यवस्थापन समितीने हे बोर्ड लावण्याबरोबरच पोलिसांकडे या प्रकरणासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने हे असे प्रकार या ठिकाणी घडत असल्याचा समितीचा दावा आहे.

Updated: Mar 1, 2023, 02:58 PM IST
...म्हणून स्मशानभूमीत लावावे लागले 'फालतू बैठना मना है' चे बोर्ड; पोलीसही हैराण title=
cremation

Board At Cremation Place: आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तरच लोक स्मशानभूमीमध्ये जातात. मात्र मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूर (Indore) जिल्ह्यामध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका स्मशानभूमीसंदर्भातील एका विचित्र अडचणीमुळे स्थानिक प्रशासकीय अधिकारी फारच हैराण झाले आहेत. त्यांनी अखेर या स्मशानभूमी प्रशासनाला एक अजब बोर्ड लावावा लागला आहे. स्मशानभूमीमध्ये असा बोर्ड पहायला मिळेल असा कोणी विचारही केला नव्हता.

'फालतू बैठना मना है' असे बोर्ड

स्मशानभूमीमध्ये येथील स्थानिक लोक कारण नसताना येऊन टंगळमंगळ करताना दिसतात. या ठिकाणी अनेक स्थानिक लोक वेळ घालवण्यासाठी येतात. त्यामुळेच येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी अशा लोकांच्या टोळ्यांचं करायचं काय यावर उपाय शोधत आहेत. याच उपायांचा एक भाग म्हणून स्थानिक प्रशासनाने या स्मशानभूमीमध्ये जागोजागी बोर्ड लावले आहेत. 'फालतू बैठना मना है' असा इशारा या बोर्डवरुन या ठिकाणी टाइमपास करण्यासाठी येणाऱ्यांना देण्यात आला आहे.

नेमकी अडचण काय?

इंदूर शहराच्या मध्य भागी तीन एकरांवर रामबाग मुक्तिधाम नावाचं स्मशान आहे. शहरातील या स्मशानभूमीची देखभाल स्थानिक प्रशासनाकडून ठेवली जाते. त्यामुळेच या स्मशानभूमीच्या आजूबाजूला फुलं झाडं, सुशोभिकरण याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. या ठिकाणी अनेक झाडं आहेत. येथे बगीचाप्रमाणे बऱ्या मोठ्या भूभागावर हिरवळ आहे. यामुळेच या ठिकाणी प्राणी-पक्षांचा वावर असतो. येथे अनेकजण पक्षांना दाणे टाकण्यासाठीही येतात. मात्र सायंकाळनंतर या ठिकाणी गर्दुल्ले आणि नशा करणाऱ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळेच या परिसारात राहाणाऱ्यांनाही असुरक्षित वाटू लागलं आहे. हाच सारा प्रकार लक्षात घेऊन मुक्तिधाम समितीने म्हणजेच स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या समितीने या ठिकाणी बोर्ड लावले आहेत.

पोलिसांकडे करण्यात आली तक्रार

इंदूर शहर हे स्वच्छतेच्याबाबतीत भारतामधील सर्वात स्वच्छ शहर आहे. त्यामुळेच स्मशानभूमीच्या आजूबाजूचा परिसरही अधिक स्वच्छ राहण्यासंदर्भात प्रकार्षाने काळजी घेतली जाते. या ठिकाणी झाडं, फुलंझाडे लावून शुशोभिकरण करण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी असामाजिक तत्वांकडून झाडांची मोडतोड केली जाते. त्यामुळेच समितीने बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी समितीचे सदस्य सुधीर दांडेकर यांनी स्थानिक पोलिसांकडेही या ठिकाणी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत बेकायदेशीर कामं होतात अशी तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये सध्या पोलीस तपास करत आहेत.