Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे. सांगलीच्या तासगाव येथील आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवारांनी माजी खासदार संजयकाका पाटलांवर टीका केली. ते भरवशाचे नाहीत हे मी आर आर पाटलांना आधीच सांगितलं होतं याची आठवण त्यांनी करुन दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात काही झाले तरी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे असा निर्धार शरद पवारांनी केला आहे,
माजी खासदार संजयकाका पाटलांवर टीका करताना शरद पवार म्हणाले, "ते भरवशाचे नाहीत हे मी आर आर आबांना आधीच सांगितलं होतं, तरीही त्यांना आमदारकी दिली. पण कार्यकाळ संपल्यावर पक्ष बदलला. आतादेखील भाजपा पक्ष सोडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते माझ्याकडे आले होते, त्यावेळी मतदारसंघात काय करणार विचारलx असता आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेणार असल्याचे सांगितलं. पण 8 दिवसातच उमेदवारीचा अर्ज भरला".
दरम्यान कोल्हापुरात शरद पवारांची पावसात सभा पार पडली. सभेत भिजलो की निकाल चांगला लागतो असं ते इचलकरंजीमधील सभेत म्हणाले.
मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा करून राज्यातील वातावरण फिरवलं होतं. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजीत देखील शरद पवार यांनी पुन्हा एकदा भर पावसात भाषण केलं आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या मदतीला पुन्हा एकदा पाऊस धावून आला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांनीदेखील आपल्या सात मिनिटांच्या भाषणात माझा जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबध आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते. भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो असं ते म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्राचा पाळणा कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सध्या सत्ता आहे त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला