Cyber Crime : इंटरनेटच्या युगात सायबर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर गुन्हेगारी (Cyber Fraud) रोखण्यासाठी कठोर नियम करण्यात आलेत, नागिरकांना विविध माध्यमातून सतर्क केलं जातंय पण यानंतरही सायबर गुन्हेगारी पूर्णपणे रोखणं शक्य झालेलं नाही. सायबर गुन्हेगार विविध मार्गाने सामान्यांची फसवणूक करत होते, पण आता तर सायबर गुन्हेगारांनी बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेटर्सनाही (Cricketers) सोडलेलं नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पॅन कार्डच्या आधारे मिळवली माहिती
सायबर गुन्हेगारीचा एकच नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी आधी सेलिब्रिटींच्या जीएसटी क्रमांकावरुन पॅन कार्डची (Pan Card) माहिती मिळवली. त्याआधारे पुण्यातील स्टार्टअप 'वन कार्ड' (One Card) कंपनीतून त्यांनी क्रेडिट कार्ड घेतली. यात अभिशएक बच्चन (Abhishek Bachchan), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), इमरान हाशमी (Imran Hashmi) या बॉलिवूड कलाकारांबरोबरच क्रिकेटकर महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) नावाचाही समावेश आहे.
'वन कार्ड' कंपनीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आरोपींनी यातल्या काही बनावट क्रेडीट कार्डचा वापर करत जवळपास 21.32 लाख रुपयांची खरेदी केली होती. कंपनीने तात्का दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. त्यआधारे कारवाई करत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव पुनीत, मोहम्मद आसिफ, सुनील कुमार, पंकज मिश्र आणि भास्कर शर्मा असं आहे. पोलिसांच्या तपासत सांगितलेली लुटीची मोडस ऑपरेंडी हैराण करणारी होती.
काय आहे लुटीची मोडस ऑपरेंडी?
बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत. याशिवाय सेलिब्रिटींची जन्मतारीख Google वर सहज मिळते. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंचे PAN डिटेल्स मिळवले. त्यानंतर बोगस पॅन कार्ड बनवण्यात आले. म्हणजे पॅनकार्डवर पॅन नंबर आणि जन्म तारीख अभिषेक बच्चनचा. पण फोटो फोटो आरोपींमधल्या एकाचा. त्यानंतर पुण्यातील फिनटेक स्टार्टअप वन कार्डकडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली. याच क्रेडिट कार्डवरून खरेदी करत कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक केली. फिनटेक कंपनीच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
सिबिल स्कोर चांगला
बँकेच्या कागदपत्र पडताळणीदरम्यान विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची हॅकर्सने सहज उत्तरं दिली. याशिवाय या सर्व सेलिब्रेटींचा सिबिल स्कोरही चांगला होता. त्यामुळे क्रेडिट कार्ड मिळवण्याचा त्यांचा मार्ग सोपा झाला.
हे झालं सेलिब्रिटीच्या बाबतीच. अशाच प्रकारे हॅकर्स तुमचाही डेटा चोरून बनावट क्रेडिट कार्ड बनवू शकतात. त्यामुळे आपले डेटा सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. कुणी तुमच्या नावानं बनावट क्रेडिट कार्ड किंवा इतर सायबर ऍक्टिव्हीटी करत असेल तर सायबर पोलिसांना तत्काळ याची माहिती द्या. नाहीतर तुमच्या नावानेही चोरटे धुमाकूळ घालू शकतात.