Crime News : पतीने पत्नीला विचारलं तू माझ्यावर किती प्रेम करतेस, माझ्यासाठी तू काय करु शकतेस. यावर पत्नीने तुझ्यावर खूप प्रेम करते, तुझ्यासाटी जीव देऊन शकते असं उत्तर दिलं. उत्तर ऐकताच पतीने तिची खरंच हत्या केली (Husband Killed his Wife). प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशीच (Valentine Day) ही धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने दरोडा पडल्याची कहाणी रचली. अगदी फिल्मी स्टाईलने रंगलेलं या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बरेली (Bareli) जिल्ह्यातली ही घटना आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी एका पतीने आपल्या पत्नीला एक प्रश्न विचारला. त्याने आपल्या पत्नीला तू माझ्या किती प्रेम करतेस असं विचारलं. पत्नीचं आपल्या पतीवर जीवापाड प्रेम होतं, त्यामुळे तीने तुझ्यासाठी जीव देऊ शकते असं उत्तर दिलं. उत्तर ऐकताच पतीने खरंच पत्नीची हत्या केली. याप्रकरणी आरोपी डॉक्टर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
म्हणून केली पत्नीची हत्या
पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव मोहम्द फारुख आलम असं आहे. बरेलीत फारुख आलमचं क्लिनिक आहे. लग्नाला काही वर्ष उलटल्यानंतर पत्नीच्या बहिणीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघांना लग्न करायचं होतं, पण पत्नी त्यांच्यात अडथळा ठरत होती. प्रेमा आड येणाऱ्या पत्नीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरोपी फारुख आलमने घेतला.
ओढणीने गळा आवळून हत्या
हत्येच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. पती-पत्नी दोघंही चांगले गप्पा मारत होते, पण त्याच्या मनात भलताच कट शिजत होता. फारुख आलमने गप्पांच्या ओघात आपल्या पत्नीला माझ्यावर किती प्रेम करतेस असा प्रश्न विचारला. तीने देखील खूप प्रेम करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर फारुख आलमने तिची ओढणी घेऊन तिचा गळा आवळला, सुरुवातीला तिला पती मस्करी करतोय असं वाटलं, पण त्यानंतर त्याने तिच्या गळ्याभोवती फास घट्ट आवळला. यात तिचा जागीच मत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वत:च्या पोटात चाकू मारुन घेतला.
दरोड्याची कहाणी रचली
जखमी अवस्थेत त्याने पोलिसांना फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपल्या पत्नीची हत्या केली आणि माझ्यावर हल्ला केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. घरातील सामानही अस्तव्यस्त असल्याने पोलिसांना आधी त्याचा कहाणीवर विश्वास बसला.
पोलिसांनी ठेवलं 25 हजारांचं बक्षिस
या प्रकरणाचं गांभीर्य पाहाता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी काही पथकं तैनात केली, तसंच आरोपींची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. पण परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता घटनेच्या दिवशी घरात कोणीही घुसलं नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, तसंच फारुख आलमही सारखे जबाब बदलत असल्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच अखेर फारुख आलमने मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.