Trending News In Marathi: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एक तरुण पोलिसांकडे तक्रार घेऊन पोहोचला होता. पत्नीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची तक्रार तरुणाने पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळं नाराज झालेल्या युवकाने धक्कादायक पाऊल उचललं आहे. ज्यामुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लखीमपुर खिरीच्या मोहल्ला कुंहारन टोला गोकर्णनाथ येथील ही घटना आहे. एका महाविद्यालयाच्या स्टेडियमजवळच या युवकाने विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवकाच्या पत्नीवर पाच मुलांनी गँगरेप केल्याचा आरोप त्याने केला होता. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही, म्हणूनच रागाच्या भरात युवकाने विषारी पदार्थाचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
पीडीत युवकाचा भाऊ मोनू गुप्ता यांने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी भाऊ सोनू गुप्ता यांने महाविद्यालयाजवळ विषारी पदार्थ खाल्ले होते. सोनूने त्यानंतर फोन करुन आपण विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णालयात उपचारादरम्यान सोनूने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने त्याच्या पत्नीवर पाच जणांनी गँगरेप केल्याचा दावा केला आहे.
युवक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्याने यासंबंधी तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी त्याचं ऐकून न घेता त्याला तिथून पळवून लावलं. शुक्रवारी एका निर्जनस्थळी आरोपींनी सोनूला माराहण केली. त्यानंतर संतापलेल्या सोनूने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचं पाऊल उचललं. कुटुंबीयांचे म्हणण्यानुसार, सोनूची पत्नी तिच्या दोन मुलांसह कुठेतरी निघून गेली आहे. मात्र, त्या प्रकरणी अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाहीये.
प्रभारी निरीक्षक इंद्रजीत सिंहने सांगितले की कारवाई न करण्याचा आरोप चुकीचा आहे. युवक नशेच्या आहारी गेला होता. महिला या आधीपण कोण्या दुसऱ्यासोबत निघून गेली होती. तक्रार देण्यासाठीदेखील तो नशेत होता. तेव्हा त्याला पोलिसांनी काही वेळ थांबून ठेवल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाहीये. चौकशी करुनच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.