ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा

Winter Storm in US : अनेक भारतीयांचे नातेवाईक मुलंबाळं कामाच्या निमित्तानं अमेरिकेत आहेत. याच अमेरिकेत सध्या हिमवादळ आल्यानं एक मोठं संकट ओढावलं आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 6, 2025, 12:43 PM IST
ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा title=
(छाया सौजन्य- AP)/ Emergency Declared Massive Winter Storm Strikes US 63 Million People Affected

Winter Storm in US : अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या हिमवर्षावानं आता कहर केला असून, अमेरिकेच्या मध्य भागामध्ये मात्र आता याच हिमवर्षावानं अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. प्रचंड बर्फवृष्टी आणि अतिशय तीव्रतेनं वाहणाऱ्या शीतलहरींमुळं इथं स्थआनिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अमेरिकेतील काही भागांमध्ये मागील 10 वर्षांमधील ही सर्वाधिक हिमवृष्टी ठरल्यामुळं तिथं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

अमेरिकेच्या कनास, वेस्टर्न नेब्रास्का, इंडियाना इथं बर्फाच्या वादळाचा जोरदार मारा होत असून, त्यामुळं इथं जगणंही कठीण झालं आहे. बर्फवृष्टीमुळं येथील अनेक रस्तेमार्ग ठप्प झाले असून, या वाटेनं प्रवास न करण्याचा सल्ला वाहनचालकांना देण्यात आला आहे. कनास इथं हिमवादळाचा इशारा राष्ट्रीय हवामान विभागानं जारी केला असून, इथं साधारण 8 इंचांपर्यंत बर्फ साचू शकतो असंही स्पष्ट केलं आहे. 

इंडियाना क्षेत्रात प्रशासनानं नॅशनल गार्ड तैनात केले असून, बर्फाच्छादित रस्त्यांवरून पुढे प्रवास करण्यासाठी ते वाहनचालकांना मदत करताना दिसत आहेत. एकिकडे अमेरिकेत हिमवर्षाव सुरू असतानाच सातत्यानं भुरभुरणारा बर्फ, घोंगावणारे वारे इथं परिस्थिती आणखी बिकट करताना दिसत आहेत. कनास आणि मिसोउरी भागांमध्ये वाऱ्याचा वेग 45 मैल म्हणजेच 72 किमी प्रतितास इतका असल्यानं इथं तापमान आणखी कमी असल्याचं भासत दृश्यमानतेवरही याचा थेट परिणाम होत आहे. 

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार इथं आलेलं हे हिमवादळ आता पूर्वेकडे सरकताना दिसत असून, राष्ट्रीय हवामान विभागानं आता सोमवार आणि मंगळवारसाठी न्यू जर्सी इथंही सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनानं ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगत नागरिकांना घराबाहरे न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. इतकंच नव्हे, तर गरज नसलाताना प्रवास टाळण्याचाही सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : थंडीमुळं देशभरातील जनजीवन विस्कळीत; राज्यातही थंडीची लाट आणखी तीव्र होणार 

तुमचं कोणी अमेरिकेत असल्यास... 

काम, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कारणानं तुमच्या कुटुंबातील, ओळखीचं कोणी किंवा तुमच्या मित्रपरिवाराती कोणीही अमेरिकेत असल्यास या सर्व मंडळींशी संपर्कात राहून तेथील परिस्थितीचा आढावा घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष व्यक्तीशीच संवाद साधत या परिस्थितीसंदर्भातील माहिती मिळवा.