Crime News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा (Student) मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी या विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) 'गुड बाय जिंदगी' अशी पोस्ट शेअर केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. पण कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गाझियाबादमधली (Ghaziabad) ही घटना असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
गाझियाबादमधल्या एनएच-9 परिसरातील आशियाना सोसायटीतील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. वरदान शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पण त्याला कोणीच पडताना बघितलं नसल्याने संशयाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांचा वरदान त्यांच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला. पण तिथे न जाता तो घरापासून 35 किलोमीटर दूर असलेल्या आशियाना सोसायटीत पोहोचला कसा? विशेष म्हणजे या सोसायटीत त्यांच्या ओळखीचं कुणीही रहात नाही.
आत्महत्या करण्यासाठी इतक्या दूर का गेला?
कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वरदानला आत्महत्याच करायची होती तर इतक्या दूर अनोळखी ठिकाणी तो का गेला? हापुड आर्यनगर इथे राहणाऱ्या वरदानचे वडिल सुनील शर्मा यांनी आपल्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत कविनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
आशियाना सोसायटीत का गेला वरदान?
वरदानचे वडिल सुनील शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी वरदान त्यांच्या ऑप्टिकल्सच्या दुकानात होता. संध्याकाळी साधारण पाच वाजण्याच्या सुमारात वरदान दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला. पण तो घरी पोहोचलाच नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने वरदान गाझियाबादमधल्या आशियाना सोसाटीतल्या एका इमारतीतून खाली पडल्याची माहिती दिली.
पण या सोसायटीत शर्मा कुटुंबियांचे कोणतेही नातेवाईक किंवा वरदानचे मित्र रहात नाहीत. त्यामुळे वरदान या सोसायटीत का गेला आणि इमारतीतून खाली कसा पडला? असे प्रश्न उपस्थित रहातात. वरदान शर्मा गाझियाबादमधल्या हायटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.
सोसायटीत प्रवेश कसा मिळाला?
आशियाना सोसायटी ही उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत बाहेरुन आलेल्या व्यक्तीची चौकशी केल्याशिवाय सोडत नाहीत. सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांकडून चौकशी केली जाते. असं असताना वरदानला सोसायटीत प्रवेश मिळाला कसा. त्याला तिथे कुणी बोलावलं होतं का, आणि इमारतीच्या 14 मजल्यावर तो पोहचला कसा? याबाबत पोलीस आता तपास करत आहेत.