'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्...

Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 1, 2024, 10:28 AM IST
'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्... title=
सदर प्रकरणाची पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे

Man Climbs Electric Transformer For Wife:  प्रेमवीरांबद्दल बोलताना मराठी अनेकदा 'प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं' ही म्हण वापरली जाते. खरोखरच प्रेमवीर प्रेमात काय करतील हे सांगणं कठीण असतं. बरं हे प्रेमवीर कायम तरुण आणि अविवाहित असतात असं नाही. कधीतरी विवाहित पुरुषांकडून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी टोकाचं पाऊलही उचललं जातं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील झाशी येथे घडला. येथील एक व्यक्तीने 'शोले' स्टाइल नौटंकी केल्याने काही क्षणांसाठी पोलिसांच्याही उरात धडकी भसली होती. 'शोले' चित्रपटातील वीरुने ज्याप्रकारे बसंतीचा हात मागण्यासाठी टाकीवर चढून नौटंकी केली होती तसाच काहीसा हा प्रकार होता.

नक्की घडलं काय?

मऊरानीपूर येथील एक विवाहित तरुण चक्क विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर चढला. यानंतर त्याने एक फारच आगळीवेगळी मागणी करत धमकावण्यास सुरुवात केली. ही व्यक्ती ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीला खाली उतरण्यास सांगितलं. मात्र या व्यक्तीने तुम्ही जाऊन आधी माझ्या पत्नीला तिच्या माहेरुन घेऊन या असं पोलिसांना सांगितलं. माझ्या पत्नीला माहेरुन परत आणल्यानंतरच मी ट्रान्सफॉर्मरवरुन खाली उतरेल असं या व्यक्तीने सांगितलं. या व्यक्तीची मागणी ऐकून पोलिसांनी आधी विजेचा प्रवाह खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बराच वेळ या व्यक्तीची समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला. 

...अन् तो खाली उतरला

ही व्यक्ती खाली उतरल्यानंतर ती नशेच्या धुंदीत असल्याचं स्पष्ट झालं. भरपूर दारु प्यायल्यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीच्या विरहामध्ये या व्यक्तीने थेट ट्रॉन्सफॉर्मरवर चढून नौटंकी केली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन सांमजस्याने आणि शांत डोक्याने परिस्थिती हाताळल्यानेच या तरुणाचा जीव वाचला. दारुच्या नशेत ट्रान्सफॉर्मरवर चढताना विद्युत प्रवाह सुरु होता तरी सुदैवाने या तरुणाला विजेचा झटका लागला नाही. एक तरुण ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच शहराचे मॅजिस्ट्रेटही घटनास्थळी आले होते. सर्वांनी या तरुणाला समज दिली आणि पत्नीला परत आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला.

पोलिसांनी सुरु केला तपास

खाली उतरल्यानंतर पोलिसांकडे या तरुणाने आपलं गाऱ्हाणं मांडलं. माझी पत्नी माहेराहून परत येत नाहीये. सासरच्या व्यक्तींनी मला बेदम मारहाण केली. तिला आता पोलिसांच्या मदतीनेच परत आणता येईल असंही या तरुणाने पोलिसांना सांगत मदतीची याचना केली. सध्या पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत असून या तरुणाची पत्नी आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींची चौकशी केली जाईल अशी माहिती मिळत आहे. तरुणाच्या घरच्या व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात चौकशी सुरु झाली असली तरी खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ही नौटंकी पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरतेय हे ही खरंच.