Indian GDP Growth: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आर्थिक वाढ तब्बल 8.4 टक्के दराने झाली आहे. देशाचा जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय सकल उत्पन्न या कालावधीमध्ये 8.4 टक्के इतके राहिले आहे. मागील तिमाहीमध्ये म्हणजेच जुलै ते सप्टेंबरमध्ये हाच आकडा 7.6 टक्के इतका आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीमध्ये जीडीपी 4.4 टक्के इतका होता. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जीडीपी जवळपास दुप्पटीने वढला आहे.
सरलेल्या तिमाहीमधील आकडेवारीबरोबरच केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी GDP चा दुसरा आगाऊ अंदाज देखील जारी केला आहे. भारताचा आर्थिक विकास दर म्हणजेच जीडीपी चालू आर्थिक वर्षात 7.6 टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हाच दर 2022-23 मध्ये 7 टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाच्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ) भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचं सांगितलं आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी डेटा जारी करताना भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत 8.4 टक्के वाढ दर्शविल्याचं नमूद केलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 40.35 लाख कोटी रुपये इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 43.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
जीडीपीच्या वाढीमध्ये उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राने सर्वात मोठा हातभार लावला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2023-24 च्या तिमाहीमधील उत्पादन क्षेत्राचा विकास दर 11.6 टक्के राहिला. तर बांधकाम क्षेत्राचा विकास दर 9.5 टक्के राहिला आहे. जीडीपी 8.4 टक्के असल्याचंही सांख्यिकी मंत्रालयाच्या एनएसओने आकडेवारी जाहीर करता स्पष्ट केलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी 7.6 टक्के राहील असा अंदाज असून 2022-23 मध्ये तो 7 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी 172.90 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीत मांडला आहे. वास्तविक जीडीपी 2022-23 मध्ये 160.71 लाख कोटी रुपये इतका होता.
2023-24 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर 3.8 टक्के राहिल्याचं एनएसओने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. हाच विकास दर जो 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत 6.7 टक्के होता. उत्पादन क्षेत्राचा विकास दर तब्बल 10.6 टक्के आहे. हाच दर गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत उणे 0.2 टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वीज, गॅस आणि पाणीपुरवठा आणि इतर कन्झम्शन क्षेत्रातील सेवांचा वाढीचा दर 4.1 टक्के राहिला. हाच दर मागील वर्षी याच कालावधीत 4.1 टक्के होता. बांधकाम क्षेत्राचा विकास दरही 10 टक्क्यांहून अधिक आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 15.5 टक्क्यांवरील बांधकाम क्षेत्रातील विकासदरात तुलनामत्मकरित्या घट नक्कीच झाली असली तरी सध्याचा दर हा 10.4 टक्के आहे. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा विकास दर 9.2 टक्के राहिला आहे. हाच दर गेल्या वर्षी याच तिमाहीत 15.4 टक्के होता. व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांचा वाढीचा दर 7.4 टक्के राहिला आहे. मागील वर्षी याच काळात या क्षेत्राचा विकासदर 15.1 टक्के होता.