Cyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळ

Cyclone Remal Video : वाऱ्यांमध्ये इतकी ताकद की, रेल्वेगाड्याही रुळांना लोखंडी साखळीनं बांधण्यात आल्या. पाहा, वादळ धडकलं त्या क्षणाची घाबरवणारी दृश्य...   

सायली पाटील | Updated: May 27, 2024, 07:46 AM IST
Cyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळ title=
Cyclone Remal landfall started high alert in west bengal trains tied with chains

Cyclone Remal Video : रविवारी (26 मे 2024)  मध्यरात्र उलटल्यानंतर बरंच उशिरा रेमल चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं. वादळ धडकल्यामुळं इथं किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 110 ते 120 किमी पर्यंत पोहोचला असून, हा वेग 135 किमीटचा आकडाही गाठू शकतो. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये - उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असून, इथं जोरदार पावसाला सुरुवातही झाली आहे. 

चक्रीदावळाच्या धर्तीवर पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. शिवाय इथं पावसाची जोरदार हजेरी असल्यामुळं नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. दरम्यान, बिहार आणि पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम मेदिनीपूर, नादिया, पूर्व बर्दवान येथे सोमवारी मुर्शिदाबादमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असून या वादळामुळे कोलकाता विमानतळ सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा 

वादळ धडकल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये नेमकी कशी परिस्थिती होती, याचे व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं जारी केले असून, त्यातून वादळाचं रौद्र रुप पाहता येत आहे. दरम्यान, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी सध्या NDRFच्या 14 टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनंही सध्या वादळावर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना चक्रीवादळाची पूर्वसूचना देत त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला वादळानंतरच्या परिस्थितीशी  यंत्रणा दोन हात करत असून, नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

 

रेल्वेही साखळदंडांनी बांधल्या... 

रेमल चक्रीवादळाच्या धोक्यामुळं हावडा येथे सावधगिरी म्हणून सोसाट्याच्या वाऱ्याची ताकद लक्षात घेता रेल्वेगाड्या रुळांना लोखंडी साखळ्यांनी बांधण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांवरून घसरु नयेत यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीसुरा हे वादळ इथून पुढं उत्तरेकडे सरकणार असून, त्याची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढून पुढे ते शांत होणार आहे.