Rajkot Fire Accident : मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव? राजकोटच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?

Rajkot TRP Game Zone Fire : राजकोट आणि दिल्लीत अग्नीतांडवाच्या दुर्घटना घडल्यात. अनेक निष्पाप जिवांचा यात बळी गेलाय. भीषण आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 08:05 PM IST
Rajkot Fire Accident : मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव? राजकोटच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?  title=
Rajkot TRP Game Zone Fire Accident

Rajkot TRP Game Zone Fire : राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 9 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाल्यानं देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय... राजकोटच्या (Rajkot Fire Accident) कालावड रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं...अख्खा गेम झोन जळून खाक झाला...गेम खेळण्यासाठी आलेल्या निष्पाप चिमुकल्यांचा यात बळी गेलाय. याप्रकरणी 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. गेम झोन सुरु केल्यापासून आतापर्यंत एकदाही अग्निशमन विभागाची NOC घेतली नसल्याचं उघड झालंय. इतकंच काय तर चिमुकल्यांसाठी असलेल्या गेम झोनमध्ये साधी अग्निशमन यंत्रणाही नव्हती. पोलिसांनी गेमझोनच्या मालकासह दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. पण मुर्दाड यंत्रणेच्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जातोय. 

अग्नितांडवाला जबाबदार कोण? 

गेल्या 4 वर्षांपासून टीआरपी गेम झोन सुरू होता. वेल्डिंगमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आलंय. गो-कार्टिंग रेसिंगसाठी गेम झोनच्या मैदानात 800 टायर होते. आग लागली त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती देण्यात आलीये.

राजकोटच्या गेम झोनमधली आग विझत नाही तोच राजधानी दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना घडली. आगीत होरपळून 7 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. विवेक विहार भागातील बेबी सेंटरला लागलेल्या या आगीतून 12 मुलांना कसंबसं वाचवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या बेबी केअर सेंटरमधील इतर मुलांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.

दरम्यान, राजकोट असो वा दिल्लीची दुर्घटना... चौकशी करून कारवाईची आश्वासनंही दिली जातील. पण यात जीव गमावलेल्या निष्पाप चिमुकल्यांची काय चूक होती? हा प्रश्न नेहमी मात्र अनुत्तरितच राहणार.

राजकोट अग्नितांडव प्रकरणी 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. गेम झोन सुरु केल्यापासून आतापर्यंत एकदाही अग्निशमन विभागाकडून एनओसी घेण्यात आली नव्हती. तसंच या गेम झोनमध्ये अग्निशमन यंत्रणाही नव्हती असा उल्लेख या तक्रारीत करण्यात आलाय.. 
राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 28 जणांचा मृत्यू झालाय. या भीषण अग्नितांडवाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलीय. याप्रकरणी गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय.