दलाई लामांची प्रकृती बिघडली, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

डॉक्टरांचे एक पथक सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे.

Updated: Apr 10, 2019, 10:01 PM IST
दलाई लामांची प्रकृती बिघडली, दिल्लीतील रुग्णालयात दाखल title=

नवी दिल्ली: तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, दलाई लामा यांच्या छातीमध्ये जंतुसंसर्ग झाला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दलाई लामा यांचे सहकारी तेझीन तकल्हा यांनी सांगितले की, दलाई लामांना हिमाचल प्रदेशातील त्यांच्या निवासस्थानी त्रास जाणवायला लागला. त्यामुळे ते विमानाने दिल्लीला आले. डॉक्टरांचे एक पथक सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना आणखी दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहावे लागेल, असे तेझीन तकल्हा यांनी सांगितले. 

साधारण ६० वर्षांपूर्वी चिनी राजवटीविरुद्ध बंड केल्यानंतर दलाई लामा भारतात आले होते. तेव्हापासून ते येथेच वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी चीनकडून दलाई लामा यांचा उत्तराधिकारी शोधण्याच्या दिशेने हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, चीनने सुचविलेला उत्तराधिकारी तिबेटीयन जनता स्वीकारणार नाही, असे सांगत दलाई लामा यांनी हा प्रस्ताव झुगारून लावला होता. 

७ एप्रिलला दलाई लामा यांनी काही आंतरराष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते धर्मशाळा येथे परतले होते.