'१९९९ मध्ये मतदान केंद्र काबीज करूनच जिंकलो होतो'

भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कीर्ती आझाद यांचे दरभंगामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Updated: Feb 20, 2019, 10:44 AM IST
'१९९९ मध्ये मतदान केंद्र काबीज करूनच जिंकलो होतो' title=

दरभंगा - भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कीर्ती आझाद यांचे दरभंगामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमात कीर्ती आझाद यांनी केलेले एक विधान वादग्रस्त ठरले आहे. १९९९ मध्ये मतदान केंद्र काबीज करूनच निवडणूक जिंकली होती, अशा आशयाचे वक्तव्य कीर्ती आझाद यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. आताच्या काळात अशा पद्धतीने निवडणूक जिंकणे शक्य नाही. पण पूर्वी असे होत होते, हे त्यांनी कबुल केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

दरभंगामध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात बोलताना कीर्ती आझाद म्हणाले, माझी पत्नी पूनम आझाद ही काँग्रेसला मानणाऱ्या परिवारातीलच आहे. त्यावेळी मी नागेंद्र झा आणि डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्यासाठी मतदान केंद्र काबीज करण्याचे काम करायचो. त्यावेळी तसे करणे शक्य होते. पण आताच्या काळात हे अजिबात शक्य नाही. माझे वडील भागवत झा आझाद यांच्यासाठी मतदान केंद्र काबीज करण्याचे कामही मी केले आहे. १९९९ मध्ये मी निवडणुकीच्या रिंगणात असतानाही मतदान केंद्र काबीज करण्याचे काम केले गेले होते, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नव्हती, अशीही एक आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच कीर्ती आझाद दरभंगामध्ये आले असल्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरभंगामध्ये आल्यानंतर कीर्ती आझाद पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयात गेले. तिथेच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपली घरवापसी झाली असल्याचे सांगितले. जन्मापासून आपण काँग्रेसचेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा धर्मवादी पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली.