मुरैना : कोंबडीच्या मालकीणीने आपल्या कोंबडीचा शेजाऱ्याने खून केल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली, त्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला, आणि यानंतर पोलिसांनी कोंबडीचं पोस्टमॉर्टम देखील केलं, यात कोंबडीचा अनैसर्गिक कारणांनी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोंबडीची मालकीण मेलेल्या कोंबडीसह पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यास दाखल झाली होती. यात आणखी कोंबडीच्या मालकीणीने म्हटलं आहे, जेव्हा मी कोंबडीला मारल्याबद्दल शेजाऱ्याला जाब विचारला, तेव्हा त्याने मला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहे.
पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीवर कलम 429, 294, 506 बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ४२९ नुसार ५० रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पाळीव प्राण्याला जीवे मारणे, किंवा त्याला मारहाण करणे, छेडछाड करणे हा गुन्हा आहे. यात ५ वर्षाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील ही घटना आहे.
आरोपीने कोंबडीला जीवे मारण्याचं कारण असं आहे की, कोंबडी दररोज पुन्हा पुन्हा त्याच्या घरात घुसत होती. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कोंबडीचा मृत्यू काठीने मारल्याने झाला असावा. कोंबडीच्या मालकीणीने आणखी एक आरोप करताना म्हटलंय, शेजाऱ्याने माझ्या कोंबडीला तर मारलंच पण, मला आणि नंतर माझ्या परिवारालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.