नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सेना प्रमुखांसोबत आणि चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये लद्दाखमधील लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षणमंत्री यांना चीनला लागून असलेल्या सीमा कशा प्रकारे मजबूत केल्या जात आहेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या भागात सुरु असलेले सीमेपर्यंत रस्ता बनवण्याचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लद्दाखसह अनेक भागात चीनशी जोडलेल्या सीमा भागात सध्या चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताने पँगोंग त्सो आणि गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक वाढवले आहेत. या दोन्ही वाद सुरु असलेल्या भागात चीनच्या सैन्याने 2 ते अडीच हजार सैन्य वाढवलं आहे.
चिनी सैन्यांकडून तैनात करण्यात आलेली सैनिकांची संख्या पाहता आता भारताने ही या भागात सैन्य वाढवलं आहे. भारताने रोडवे आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने ए ग्रिम भागात अधिक सैन्य पाठवले आहे. लद्दाखमध्ये भारताने गस्त वाढवली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत चीनने अतिक्रमण केलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सीमावर्ती भागातही गस्त घातली जात आहे. सिक्कीम सेक्टरमध्ये ही सैनिक वाढवण्यात आले आहेत. चिनी सैन्याकडून कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी सैनिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चीनने आपले सैन्य वाहतूक करण्यासाठी आणि भारतीय सीमेजवळील गालवण भागात वस्तू पुरवण्यासाठी अनेक रस्ते बांधले आहेत. हे लक्षात घेता भारताने देखील या भागातील सीमेपर्यंत जाण्यासाठी रस्ते बांधणीच्या कामांना वेग दिला होता, यावर चीनने आक्षेप घेतला आहे. दोन्ही सैन्याकडून पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व लद्दाख आणि सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती.