Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: बुद्धिबळ जगज्जेतेपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश दोम्माराजूसाठी एक गूड न्यूज आहे. बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर मात करत 18 व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावणाऱ्या गुकेशला भारताच्या अर्थ मंत्रालयाकडून मोठा दिलासा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डी. गुकेशला जगज्जेता पदाबरोबरच बक्षिसाची रक्कम म्हणून 11 कोटींहून अधिक रुपये मिळाले आहेत. याचसंदर्भात अर्थ मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे.
जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये डी. गुकेशने चीनच्या डिंग लिरेनवर मात करत जग्गजेतेपदावर नाव कोरलं. बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करणाऱ्या 'फिडे'च्या नियमांनुसार, जगज्जेता पदाच्या स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकल्यानंतर खेळाडूला 2 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 1.68 कोटी रुपये मिळतात. उरलेली रक्कम अंतिम सामना खेळणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये वाटून दिली जाते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना दिली जाणारी एकूण रक्कम ही 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 21 कोटी रुपये इतकी आहे. गुकेशने या स्पर्धेमध्ये एकूण 3 सामने जिंकले. त्याचे त्याला 6 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 5.04 कोटी रुपये मिळाले. डिंग लिरेन दोन सामने जिंकल्याने त्याला 4 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 3.36 कोटी रुपये मिळाले. उतरलेली 1.5 मिलियन रुपयांची रक्कम दोघांना वाटून देण्यात आली. गुकेशला जेतेपदाबरोबरच बक्षिस म्हणून 1.35 मिलियन म्हणजेच 11.34 कोटी रुपये मिळाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या नेतृत्वाखालील अर्थ मंत्रालयाने डी. गुकेशला मिळालेल्या 11 कोटी 34 लाख रुपयांच्या बक्षीसावर कर न आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं 'द फिलॉक्स' या वेबसाईटने म्हटलं आहे. अर्थमंत्रालयाने आपल्याशी संपर्क साधला असल्याचा दावा राजस्थानमध्ये मुख्यालय असलेल्या या वेबसाईटने केला असून डी. गुकेशने मोठ्या कष्टाने मिळवलेलं हे जग्गजेतेपद आणि त्यासोबत मिळालेल्या रक्कमेवर कर न आकारण्याची विनंती मान्य केल्याचं वेबसाईटचं म्हणणं आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती लवकरच जारी केली जाणार असल्याचंही मंत्रालयाकडून सागण्यात आल्याचा सदर वेबसाईटचा दावा आहे. म्हणजेच डी. गुकेशने बक्षिस म्हणून मिळवलेल्या 11.34 कोटी रुपयांपैकी एका रुपयावरही कर द्यावा लागणार नाही असं सांगितलं जात आहे.
तामिळनाडूमधील काँग्रेस खासदार आर सुधा यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पत्र लिहून डी. गुकेशने जिंकलेल्या बक्षिसाच्या रक्कमेवर त्याला करसवलत द्यावी अशी विनंती केली होती. डी. गुकेशचं यश किती मोठं आहे याचा उल्लेख खासदाराने पत्रात केला आहे. काँग्रेसची सत्ता असताना कशाप्रकारे सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांना त्यांनी मिळावलेल्या बक्षिसावर करसवलत देण्यात आलेली याचा उल्लेखही या खासदाराने पत्रात केला आहे. मात्र या पत्राला कोणतेही उत्तर मिळालेलं नसल्याचं समजते.
वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप जिंकल्याने गुकेशची एकूण संपत्ती 21 कोटींवर पोहोचली आहे. भारतीय कायद्यानुसार, गुकेशची कमाई पाहिल्यास त्याला 30 टक्के कर भरावा लागणार आहे. म्हणजेच त्याला 3 कोटींचा आयकर भरावा लागणार अशा बातम्या समोर आल्या. यावर अतिरिक्त उपकरही आकारला जाणार असल्याने गुकेशला एकूण 4.67 कोटी रुपये आयकर भरावा लागणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता गुकेशच्या या बक्षिसावर कर न आकारण्याचं अर्थमंत्र्यालयाने ठरवल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात डी. गुकेश किंवा अर्थमंत्र्यालयाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.