वेळच अस्तित्वात नसलेली पृथ्वीवरील जागा! घड्याळबंदीची स्थानिकांनी केलेली मागणी; निसर्गसौंदर्य एकदा पाहाच

Travel News : वेळ... या ठिकाणी येणारा प्रत्येकजण ही वेळच दूर कुठेतरी विसरून येतो. कारण इथं ही 'वेळ'च अस्तित्वात नाही. तुम्हाला आवडेल का अशा ठिकाणी भटकंतीसाठी जायला?  

सायली पाटील | Updated: Dec 19, 2024, 02:04 PM IST
वेळच अस्तित्वात नसलेली पृथ्वीवरील जागा! घड्याळबंदीची स्थानिकांनी केलेली मागणी; निसर्गसौंदर्य एकदा पाहाच title=
Norwegian island Sommaroy a place which became worlds first time free zone know the reason travel news

World Travel News : वेळ कोणाच्याही हातात नसते, किंवा वेळ कोणालाही थांबवता येत नाही... असं अनेकजण अनेक प्रसंगी म्हणतात. किंबहुना ही वाक्य अनेकदा कानी पडतात आणि वेळेचं महत्त्वं सातत्यानं लक्षात येत असतं. पण, ही वेळच अस्तित्वात नसली तर? 

वेळच नसेल तर नेमकं काय होईल? काही कल्पना आहे? ही कल्पनाच नव्हे, तर प्रत्यक्षातच वेळेना न जुमानणारं एक ठिकाणही या जगात अस्तित्वात आहे. दूर देशी अर्थात नॉर्वेमध्ये एक असं बेट आहे जिथं वेळ ही संकल्पनाच कोणी पाळत नाही, ज्यामुळं इथं दिवस आणि रात्रसुद्धा अस्तित्वात नाही. वेळेचं अस्तित्वं शून्य असणाऱ्या या ठिकाणाचं नाव आहे समरॉय. 

नॉर्वेच्या किनारपट्टी क्षेत्रावरील हे ठिकाण म्हणजे खऱ्या अर्थानं जगाच्या नकाशावर मानवी हस्तक्षेपापासून दूर असणारं एक दुर्मिळ ठिकाण. आर्क्टिक वर्तुळाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या या बेटावर 69 दिवस अखंजड सूर्यप्रकाश असतो, इथं या दिवसांना वसंत ऋतूचे दिवस म्हटले जातात. त्याप्रमाणं इथं तितकीच कडाक्याची आणि मोठ्या मुक्कामी असणारी थंडीसुद्धा रक्त गोठवते. 

2019 मध्ये या बेटानं जगभरातून अनेकांचच लक्ष वेधत आपलं वेगळं स्थान या जगाच्या नकाशावर निर्माण केलं. यास कारणाभूत ठरली ती म्हणजे एक अशी कल्पना ज्याअंतर्गत पारंपरिक 24 तासांची कालमर्यादा / घड्याळ इथं नाकारण्यात आलं. पर्यटनाच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल ठरलं. या संकल्पनेअंतर्गत इथं 300 कुटुंब कशा पद्धतीनं कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय इथं कसं वास्तव्य करतात हे दाखवून देण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय? 

इथं स्थानिक फुटबॉल खेळताना, पोहताना आणि हायकिंग करताना दिसतात. अगदी जगभरातील वेळेनुसार म्हणावं तरी रात्री उशिरापर्यंतसुद्धा इथं हे सारं सुरूच असतं... मध्यरात्रीच्या उजेडातही इथं वर्दळ असते. निरभ्र आकाश, स्वच्छ पाणी, रंगीत टुमदार घरं आणि रात्री आकाशात दिसणारा रहस्यमयी, जादुई प्रकाश या साऱ्यासह समरॉय एक तणावविरहीत आयुष्य जगण्याची संधी इथं येणाऱ्या प्रत्येकालाच देतं. ही एकमेव अशी जागा आहे जिथं वेळेला अजिबात महत्त्वं नसून, ती कालबाह्य ठरते. निसर्गाशी एकरुप होण्यासाठी हे एक योग्य ठिकाण असून, इथं स्वत:ला नव्यानं भेटण्याची संधी मिळते. काय मग....एकदातरी या ठिकाणाला भेट देणार ना?