Crime News : केवळ बदला घेण्यासाठी एका आठ वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी मुलीचं अपहरण करतानाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दिल्लीतली ही घटना आहे.
आरोपी आणि मृत मुलगी एकाच परिसरात रहातात. मृत मुलीच्या भावाबरोबर आरोपीचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातून तिच्या भावाने आरोपीला मारहाण केली होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता. मारहाणीचा बदला घेण्यासाठी तो संधी शोधत होता.
शुक्रवारी दिवसभर मुलगी न सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यावेळी पोलिसांनी एका सीसीटीव्हीत आरोपीला मुलीला घेऊन जातानाचं दृश्य दिसलं. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. अवघ्या दोन तासातच पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं.
पोलीस चौकशीत आरोपीने धक्कादायक माहिती दिली. मुलीच्या भावाने मारल्याच्या रागातून मुलीचं अपहरण केलं. तिच्या घरापासून एक किलोमीटर दूर तिला नेलं आणि तिथेच तिची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी मुलीच्या घराशेजारीच रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.