Crime News : देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमधील मयूर विहार परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका 19 वर्षीय गर्भवती तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा जखमी झालेल्या पीडित गर्भवती तरुणीचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीचा जीव घेण्याच्या उद्देशाने प्रियकराने स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड आणि दगडांचा वापर करुन हल्ला केला. प्रेयसीने गर्भपात करावा अशी त्याची मागणी होती. मात्र या तरुणीने गर्भपात करण्यास विरोध केल्याने दोघांमध्ये टोकाचा वाद झाला.
आरोपीचं नाव योगेश डेढा असं आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एका आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काम करणारी ही तरुणीवर गुरुवारी सकाळी चिल्ला गावामधील अग्नीशामनदलाच्या केंद्राजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. यासंदर्भातील माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पीडितेला लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. सध्या ही तरुणी मरणाशी झुंज देत आहे. या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
पूर्व दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अचिन गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश डेढा हा चिल्ला गावचा रहिवाशी आहे. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाला आहे असं समजून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर योगेश घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी शनिवारी आरोपी योगेशला अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं.
पोलिसांच्या अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश आणि पीडिता एकाच परिसरामध्ये राहत होते. दोघेही एकमेकांना ओळखायचे. अधिकाऱ्याने, "दोघे मागील 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र जेव्हा या तरुणीने योगेशला आपण तुझ्या बाळाला जन्म देणार आहोत, असं सांगितलं तेव्हा दोघांमध्ये वाद झाला," असं सांगितलं. बाळाला जन्माला घालवं की नाही याबद्दल लोघांची वेगवेगली मतं होती. योगेशला हे मूल नको होतं म्हणून तो प्रेयसीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होता. तो तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालायचा.
तरुणी योगेशचं म्हणणं ऐकून गर्भपात करण्यास तयार नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या योगेशने प्रेयसीला संपवण्याचा प्लॅन तयार केला. काहीतरी कारण सांगून त्याने प्रेयसीला एकांतात भेटण्यासाठी बोलावलं. अशोक नगर मेट्रो स्थानकाजवळ दोघे भेटले. त्याचवेळी योगेशने तिच्यावर स्क्रूडायव्हर, ब्लेड आणि दगडांनी हल्ला केला. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे असं समजून योगेश घटनास्थळावरुन पळून गेला. तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.