आता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु, दोन आमदारांचा पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन आमदारांनी प्रवेश केला आहे.

Updated: Jan 22, 2020, 09:44 PM IST
आता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु, दोन आमदारांचा पक्षप्रवेश title=

नवी दिल्ली : दिल्ली निवडणुकीच्या आधी 'आप'ने तिकीट नाकारलेले दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. या दोन्ही आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं आहे. आमदार फतेह सिंग आणि कमांडो सुरिंदर सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीमध्ये हे दोघं राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.

या दोन्ही आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर दिल्ली अभी दूर नही... अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत. हा वटवृक्ष आणखी बहरो! आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांचे पक्षात स्वागत!', असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

दिल्ली निवडणुकीसाठी आपने ७० उमेदवारांची घोषणा केली. आपने या निवडणुकीत १५ आमदारांना तिकीट दिलं नाही, यामध्ये फतेह सिंग आणि सुरिंदर सिंग यांचा समावेश आहे. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या या दोघांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने फतेह सिंग यांना गोकलपूर तर सुरिंदर सिंग यांना दिल्ली कॅन्टॉन्मेंटमधून उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. फतेह सिंग आणि सुरिंदर सिंग यांच्याशिवाय राष्ट्रवादीने झाहिद अली यांना बाबरपूरमधून, प्रशांत गौर यांना गोंडामधून, राणा सुजीत सिंग यांना छत्तरपूरमधून, मयूर भान यांना मुस्तफाबादमधून आणि अमिस बेग यांना चांदणी चौकातून उमेदवारी दिली आहे.