राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.
पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल 18 किलोहून अधिक सोनं ठेवण्यात आलं होतं. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं.
बिलासपूर पोलिसांच्या एसीसीयू आणि सिव्हिल लाइन स्टेशनच्या पथकाने सात चोरींमध्ये सहभागी असलेल्या लोकेश श्रीवासला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना त्याच्याकडे दिल्लीमधील शोरुममधून लुटण्यात आलेलं 18 किलो सोनं सापडलं आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या चोरींमधून लुटलेली 12 लाख 50 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.
रविवारी दिल्लीमधील जंगपुरा परिसरात झालेल्या चोरीनंतर एकच खळबळ उडाली होती. शोरुमचं छत फोडून चोर आतमध्ये घुसले होते आणि जवळपास साडे 18 किलो सोनं आणि हिऱ्यांचे दागिने लुटले होते. यानंतर चोर फरार झाले होते.
आरोपींना अटक केल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलीस रात्री उशिरा छत्तीसगडमध्ये दाखल झाले. एक दिवसापूर्वीच बिलासपूर पोलिसांनी लोकेशचा साथीदार शिवा चंद्रवंशीला दागिन्यांसह 23 लाखांचा मुद्देमाल पकडला होता. यावेळी लोकेश खिडकीतून उडी मारुन पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
पोलिसांना तपासादरम्यान, जंगपुरामधील ज्वेलरी शॉपच्या चोरीत सहभागी असणारा मास्टरमाइंड दक्षिण भारतातील अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली. राजधानी दिल्लीत झालेली ही चोरी आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी होती.
उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन हे मिळून हे ज्वेलरी शोरुम चालवत होते. रविवारी 24 सप्टेंबरला रात्री 8 वाजता कर्मचाऱ्यांनी दुकान बंद केलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता शोरुम उघडण्यात आलं असता कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. चोरांनी संपूर्ण शोरुमच लुटलं होतं. चोरांनी फक्त कपाटं आणि शोकेसमधील सोनं चोरलं नव्हतं तर गुप्त ठिकाणी असणाऱ्या रुममध्येही चोरी केली होती. सोने, चांदी यासह महागडे जेम्स स्टोन म्हणजेच हिरेही चोरांनी लुटले होते.