Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व ओडिशा आणि रांची येथील कार्यालयात आयकर विभागाची अजूनही झाडाझडती सुरू आहे. साहू यांच्या संबंधीत संस्थांवही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत या छापेमारीत बेहिसाब रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लवकरच हा आकडा 290 कोटींचा आकडा पार करु शकतो, असं सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळे धन आहे. या व्यतिरिक्त 3 सूटकेस ज्वेलरी सापडली आहे. तर, आत्तापर्यंत 250 कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशाच्या सरकारी बँकेच्या खात्यात सातत्याने रोख रक्कम जमा केली जात आहे. छाप्यात सापडलेली रक्कमेत 500च्या नोटा सर्वाधिक आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने छापेमारीत सापडलेली रक्कम मोजण्यासाठी 40 मोठ्या मशीन आणि छोट्या मशीन आणल्या आहेत. रक्कम मोजण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयकर विभाग आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. ही छापेमारी 6 डिसेंबरला बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य यांच्याविरोधात सुरू केली होती. आज या कारवाईचा चौथा दिवस आहे. बालांगिर जिल्हाच्या विविध ठिकाणी 100 हून अधिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
भारतीय एसबीआय बालांगिरच्या क्षेत्रीय प्रबंधक भगत बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दोन दिवसांपासून पैसे मोजण्याचे काम करत आहोत. 50 कर्मचारी पैसे मोजत आहेत आणि अन्य कर्मचारी लवकरच आमच्या मदतीसाठी येणार आहेत. आम्हाला 176 बॅग सापडले होते त्यातील फक्त 46 बॅगांमधील रक्कम मोजून झाली आहे. ज्या 46 बॅगमधील रक्कम आम्ही मोजली आहे त्यात आम्हाला एकूण 40 कोटी मिळाले आहेत. जप्त करण्यात आलेली रक्कम सरकारी बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. रक्कम मोजण्याचे काम शनिवारपर्यंत संपण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये आत्तापर्यंत जी कॅश आणि ज्वेलरी सापडली आहे आणि ज्या 136 बॅगेतील रक्कमेची मोजणी सुरू आहे. ही सर्व रक्कम 500 कोटींपर्यंत पोहोचू शकते.
सूत्रांनुसार, देशातील कोणत्याही तपास यंत्रणेने एकच गट आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविरुद्ध केलेल्या कारवाईत आतापर्यंतची ही सर्वाधिक रोख जप्ती आहे. बालंगीर जिल्ह्यातील कंपनीच्या आवारात ठेवलेल्या सुमारे 8-10 कपाटांमधून सुमारे 230 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, तर उर्वरित तितलागढ, संबलपूर आणि रांची येथील ठिकाणांवरून जप्त करण्यात आली.