डोमिनोज गर्लला भर रस्त्यात मारहाण, चार मुलींनी लाथाबुक्क्यांनी मारल्याचा Video Viral

लेडी गँग नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुलींची दादागिरी पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

Updated: Jun 14, 2022, 01:56 PM IST
डोमिनोज गर्लला भर रस्त्यात मारहाण, चार मुलींनी लाथाबुक्क्यांनी मारल्याचा Video Viral title=

Viral News: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की ते पाहून पायाखालची वाळू सरकरते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चार मुली डोमिनोजची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणीला मारत असल्याचं दिसत आहे. तर पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर चार मुलींना अटक करण्याची मागणी केली आहे. लेडी गँग नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुलींची दादागिरी पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदौरमधील असल्याचं बोललं जात आहे.  

डोमिनोज गर्लला शनिवारी मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओत दोन मुलींनी पीडित तरुणीचे हात पकडल्याचं दिसत आहे आणि एक मुलगी पाठून पीडित तरुणीच्या डोक्यावर आणि पाठीवर दांड्याने मारत आहे. त्यानंतर चारही मुली तिच्याभोवती घोळका करून तिच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. मारहाणीमुळे पीडित तरुणी खाली पडते. त्यानंतरही चार जणींना तिची दया येत नाही. त्यापैकी एक जण दांडा उचलून पीडितेला मारहाण करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चार मुलींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. "ऋषि पॅलेसमध्ये राहणाऱ्या नंदनी यादवने या कॉलनीत राहणाऱ्या पिंकी आणि इतर मैत्रिणींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.", असं पोलिसांनी सांगितलं. "चार पैकी एका मुलीने मला जवळ बोलवलं. मी तिथे गेल्यावर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली", असं पीडित तरुणींनी सांगितलं आहे. मारहाण होत असताना इतर लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. घटनेनंतर चारही मुली फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.