Video : गाढविणीच्या दुधाच्या साबणाने महिला सुंदर दिसतात... भाजप खासदाराचे वक्तव्य

Donkey Milk Soap : गाढविणीच्या दुधाचा साबण दिल्लीत 500 रुपयांना विकला जातो. आपण शेळीच्या दुधापासून साबण बनवायला हवा, असेही भाजपच्या खासदार आणि माजी मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे  

Updated: Apr 2, 2023, 06:45 PM IST
Video : गाढविणीच्या दुधाच्या साबणाने महिला सुंदर दिसतात... भाजप खासदाराचे वक्तव्य title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Maneka Gandhi : महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांवरुन (beauty products) कायमच चर्चा सुरु असते. काही महिन्यांपूर्वी सौंदर्यप्रसाधनांमुळे महिलांच्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या काही घातक घटकांमुळे महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागल्याचेही समोर आले आहे. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री भाजपच्या (BJP) खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी एक अजब दावा केला आहे. गाढविणीच्या दुधापासून (Donkey Milk Soap) बनवलेल्या साबणाने स्त्रिया सुंदर राहतात, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे. मनेका गांधी या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि सुलतानपूरच्या भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सुलतानपूरच्या बलदिराईत बोलताना खासदार मनेका गांधी यांनी हे विधान केले आहे. "गाढविणीच्या दुधापासून बनवलेला साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो. परदेशात एक अतिशय प्रसिद्ध 'क्लियोपात्रा' नावाची राणी राहायची. ती गाढविणीच्या दुधाने आंघोळ करायची. गाढविणीच्या दुधाचा साबण दिल्लीत 500 रुपयांना विकला जातो. आपण शेळीच्या दुधाचा साबण का बनवत नाही," असे मनेका गांधी म्हणाल्या.

"किती दिवसांपासून आपण गाढवे पाहिली नाहीत. ती कमी झाली आहेत किंवा गायब झाली आहेत. धोब्याचे कामही संपले आहे. पण लडाखमध्ये तिथल्या लोकांनी गाढविणीचे दूध काढण्यास सुरुवात केली आणि त्या दुधापासून साबण बनवला.  गाढविणीच्या दुधाचा साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

"सध्या झाडे लुप्त होत आहेत. लाकूड तर इतके महाग झाले आहे की माणूस मेला तर त्याचे संपूर्ण कुटुंब गरीब होऊन जाईल. अंत्यसंस्कारामध्ये लाकडासाठी 15-20 हजार लागतात. त्यामुळे शेणाचे वापर करणे चांगले आहे. ज्याचा मृत्यू होईल त्याचे अंत्यसंस्कार शेण टाकून करण्यात यावेत असा आदेश द्यायला हवेत. त्यामुळे 1500 ते 2000 पर्यंत विधी उरकले जातील," असा सल्लाही मनेका गांधी यांनी दिला.

दरम्यान, मनेका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे खरेच घडते का, असा सवाल लोक करत आहेत. जर गाढव इतकं फायदेशीर असेल तर ते प्रत्येक घरात ठेवलं पाहिजे. आरोग्याबरोबरच सौंदर्य टिकेल, असेही एका युजरने म्हटलं आहे.