'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा

जाणून घ्या गोवा पर्यटन विभागाकडून केल्या गेलेल्या या नवीन नियमांबाबत

Updated: Jan 25, 2019, 01:59 PM IST
'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा title=

गोवा : पर्यटनासाठी सर्वात आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या गोव्यात आता पर्यटकांसाठी काही कडक नियम घालण्यात आले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रीमंडळाकडून पर्यटन क्षेत्रातील काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलण्यात आलेल्या नियमावलीनुसार मंत्रीमंडळाकडून समुद्र किनाऱ्यावर मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मद्यपान करताना पकडले गेल्यास २ हजार रूपयांपर्यतचा दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. गुरूवारी पर्यटन नियमांत केलेल्या संशोधनानुसार हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियामांतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास रोख लावण्यास मदत मिळू शकते.

गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले की, 'सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर घातलेल्या बंदीसह पर्यटन विभागाकडून आणखी एक बदल करण्यात आला आहे'. राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन मंत्रालयामध्ये नोंदणी केल्याशिवाय काही प्रवासी टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीज हॉटेलचे बुकींग करतात. राज्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बुकींगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून बेकायदेशीररित्या हॉटेलचे बुकींग केले गेल्यास त्याला कारावासाची शिक्षा होणार आहे.

पर्यटन विभागाकडून २०१७ या वर्षापासून पर्यटनाच्यादृष्टीने आखण्यात आलेल्या नियमांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू होते. गोव्यातील अनेक स्थानिक नागरिकांकडून मद्यपींमुळे होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार तक्रार करण्यात आली होती. मद्यपी अनेक वेळा जागेवरच मद्याच्या बाटल्या फोडतात, त्यामुळे किनाऱ्यावर कचरा होत असून यामुळे जखमी होण्याचीही शक्यता असते. गोव्याचे कलंगुट, बागा, कंडोलिम, अंजुना, मॉर्जिम यांसारख्या प्रसिद्ध किनाऱ्याजवळील स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता नियम अधिक कडक केले असून पर्यटकांसाठी समुद्र किनारी मद्यपानास बंदी घालण्यात आली आहे.