दारूसाठी २५ हजार रूपयांना विकला ११ महिन्यांचा पोरगा; दारूड्या बापाचे कृत्य

केवळ दारूच्या व्यसनापाई नराधम बापाने चक्क पोटच्या पोरालाच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ११ महिन्यांचे हे बाळ २५ हजार रूपयांना विकण्यात आले. ओडीसातील भद्रक जिल्ह्यात ही घटना घडली. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 07:17 PM IST
दारूसाठी २५ हजार रूपयांना विकला ११ महिन्यांचा पोरगा; दारूड्या बापाचे कृत्य title=

भुवनेश्वर : केवळ दारूच्या व्यसनापाई नराधम बापाने चक्क पोटच्या पोरालाच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ११ महिन्यांचे हे बाळ २५ हजार रूपयांना विकण्यात आले. ओडीसातील भद्रक जिल्ह्यात ही घटना घडली. 

बलराम मुखी असे या दारूड्या बापाचे नाव असून, पेशाने तो सफाई कर्मचारी आहे. बलरामला दारूचे प्रचंड व्यसन आहे. धक्कादायक असे की, त्याने आपली पत्नी वर्षा मुखी आणि मेव्हणी बलीया याच्यासोबत संगनमत करून मुलाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. प्राप्त माहितीनुसार मेव्हणी बलीया ही अंगणवाडी सेविका आहे. दरम्यान, एकदा सोमनाथ सेठी नावाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत बलीयाची ओळख झाली. या व्यक्तिच्या २४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या व्यक्तिला बाळ विकण्याचा कट बलीयाच्या डोक्यात शिजत होता.

सोमनाथ सेठी हा सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी होता. २४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर त्याची पत्नी नेहमी नैराश्येत असायची. पत्नीला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो एक मुलगा दत्तक घेऊ इच्छित होता. त्याने आपल्या परिचयाच्या लोकांना तसे सांगूनही ठेवले होते. तो बलिया सेठी हिला ओळखत होता. त्यामुळेच बलियाने बलराम मुखी आणि सोमनाथ यांच्यात सौदा घडवून आणला.

व्यवहार ठरल्यावर सोमनाथ सेठी यांनी २५ हजार रूपये रोख स्वरूपामध्ये बलराम मुखी यांला दिले. या पैशातून त्याने दोन हजार रूपयांचा मोबाईल खरेदी केला. मुलीसाठी एक चांदीचे पैंजन आणि पत्नीसाठी एक साडी खरेदी केली आणि उरलेले सर्व पैसे दारूवर उडवले. 

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.