Viksit Bharat Quiz Challenge: तुमच्या व्हॉट्सअॅपवर सरकारचे मेसेज येत असतील तर एक मेसेज तुम्हालाही आला असेल. विकसित भारत क्विज चॅलेंजचा हा मेसेज आहे. ज्यामध्ये तुम्हाला क्विजमध्ये सहभागी होण्याची संधी मिळतेय. यात जिंकणाऱ्या युवकांना 1 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे. 25 नोव्हेंबरपासून 'माय भारत पोर्टल'वर ही क्विझ आयोजित केली जात आहे. माय भारत इनिशिएटिव्हच्या माध्यमातून 'विकसित भारत यंग लीडर्स संवाद कार्यक्रमा'चे आयोजन 'युवा आणि क्रीडा मंत्रालया'च्या माध्यमातून केले जात आहे. यामध्ये विजयी स्पर्धकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. काय आहे विकसित भारत चॅलेंज? सविस्तर जाणून घेऊया.
15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक विकास भारत क्विझमध्ये सहभागी होऊ शकतात. विविध टप्प्यात ही क्विझ होणार आहे. भारताबद्दलच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुमच्या ज्ञानाची चाचणी यात होणार आहे. मागील टप्प्यातील विजेते दुसऱ्या टप्प्यात निबंध आणि ब्लॉग लेखनात सहभागी होतील. यामध्ये विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण इत्यादी 10 निवडक विषयांवर निबंध लिहावे लागणार आहेत. ज्यामध्ये स्पर्धकांचे राष्ट्रीय विकासाबाबतचे विचार स्पष्ट होणार आहेत.
विकास भारत क्विझ चॅलेंज देशभरातील 12 विविध भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी, मराठी आणि ओडिया अशा 12 भाषांचा समावेश आहे.
क्विझमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. दुसऱ्या क्रमाकांसाठी 75 हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी 50 हजार, पुढील टॉप 100 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचं, त्याव्यतिरिक्त पुढील टॉप 200 सहभागींना 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी झालेल्या स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या क्विजमध्ये सर्व भारतीय सहभागी होऊ शकतात. पण एक स्पर्धक एकच अर्ज करु शकतो. तुमच्याकडे 10 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 300 सेकंद असतील.एकदा एंट्री सबमिट केल्यानंतर ती मागे घेता येत नाही.
अनपेक्षित परिस्थितीत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने स्पर्धेच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याचा किंवा स्पर्धा कधीही रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
विजेत्यांना स्पर्धकांना कॅश प्राइज घेण्यासाठी बँक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी MyGov प्रोफाइलवर यूजर नेम, बँक खात्याच्या नावाशी जुळले पाहिजे. सहभागींनी त्यांचे नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि शहराचे नाव असा तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.