'मोदींच्या हातात अर्थव्यवस्था सुरक्षित; मनमोहन सिंग म्हणजे कळसुत्री बाहुली'

आता वातावरण 'मोदी है तो मुमकीन है' असे आहे

Updated: Sep 3, 2019, 08:43 PM IST
'मोदींच्या हातात अर्थव्यवस्था सुरक्षित; मनमोहन सिंग म्हणजे कळसुत्री बाहुली' title=

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे. पडद्यामागील काही लोक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा वापर कळसुत्री बाहुलीप्रमाणे करत असल्याची टीका भाजप नेते सांबित पात्रा यांनी केली. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले होते. यासाठी मोदी सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 

या टीकेला प्रत्युत्तर देताना सांबित पात्रा यांनी म्हटले की, मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते. मात्र, काही लोक पडद्यामागे राहून त्यांचा कळसुत्री बाहुलीप्रमाणे वापर करत आहेत. या माध्यमातून त्यांना भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे समर्थन करायचे आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची काय अवस्था झाली होती, हे आपण पाहिलेच आहे. 

आता वातावरण 'मोदी है तो मुमकीन है' असे आहे, कारण त्यांच्या त्यांच्या सहा वर्षांच्या सत्ताकाळात ताकदवान अर्थव्यवस्थेची निर्मिती केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली असूनही भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे सशक्त पाया आणि तत्त्वे आहे, असेही सांबित पात्रा यांनी सांगितले.

याशिवाय, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मनमोहन सिंग यांच्या दाव्याचे खंडन केले. आम्हाला मनमोहन सिंग यांचे आर्थिक विश्लेषण मान्य नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. आता ती ५ व्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने देशाची आगेकूच सुरू आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मनमोहन सिंग यांनी काय म्हटले होते?
भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था ही अतिश्य गंभीर आहे. गेल्या तिमाहातील पाच टक्के इतका विकासदर आपण मोठ्या आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यापेक्षा कितीतरी पटीने विकसित होण्याची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात सापडली आहे. सूडाचे राजकारण बाजूला ठेवून या मानवनिर्मित संघर्षाच्या स्थितीला तोंड द्यावे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.