ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी गौतम खेतानला अटक, भारताबाहेर पैसे पाठवण्याचा आरोप

काळा पैसा बाळगल्याप्रकरणी तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी खेतान याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Updated: Jan 26, 2019, 06:03 PM IST
 ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी गौतम खेतानला अटक, भारताबाहेर पैसे पाठवण्याचा आरोप  title=

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी गौतम खेतान याला आणखी एका गुन्ह्यात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. काळा पैसा बाळगल्याप्रकरणी तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी खेतान याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खेतान याच्या नावावर अनेक बेनामी खाती असून, या खात्यांमध्ये काळा पैसा साठवण्याचा आल्याचा आरोप आहे. ऑगस्टा वेस्टलँड गैरव्यवहार प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या ख्रिस्तियन मिशेल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खेतान याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी खेतान याच्या कार्यालयांवरही आयकर खात्याने धाडी घातल्या होत्या. यूपीएच्या कार्यकाळात ऑगस्टा वेस्टलँड व्यतिरिक्त इतर सुरक्षा करारामध्ये कथित दलाली कमावल्या प्रकरणी वकीलांनी भक्कम पुरावे एकत्र केले आहेत. 

ही संपूर्ण कारवाई तो वकीलांमार्फत नियंत्रित करत होता आणि पैसे इथून तिथे पाठवण्यास तोच जबाबदार होता असे ईडीने म्हटले आहे. तो आपले संपर्क आणि ग्राहकांचा दुरूपयोग करत होता. यातील अनेक संपर्क हे त्याला आपल्या वडीलांकडून वारश्याने मिळाले होते. ही रक्कम दुबई, मॉरीशस, सिंगापूर, ट्यूनीशिया, स्वित्झरलॅंड, ब्रिटन आणि भारतातील अनेक खात्यातून फिरवत होता. 

Image result for agustawestland-co-accused zee news

भारताबाहेरच्या ज्या खात्यांमध्ये तो रक्कम जमा करायचा त्यामधील त्यामध्ये त्याने विक्री केलेल्या कंपनीची खाती देखील होती. खेतानचे एक जाम्बिया कनेक्शन देखील उघडकीस आल्याचे सुत्रांकडून कळत आहे. खेतानला ऑगस्टा वेस्टलँड करारातील कथित घोटाळ्यात पहिल्यांदा सप्टेंबर 2014   साली अटक करण्यात आली होती. जानेवारी 2015 मध्ये त्याला जामिन मिळाला. पण सीबीआयने त्याला दुसरा आरोपी संजीव त्यागी सोबत डिसेंबर 2016 मध्ये पुन्हा अटक केली. त्यानंतरही लगेच त्याला जामिन मिळाला. ऑगस्टा वेस्टलँड करारामागे खेतान मास्टरमाईंड असल्याचे सीबीआयच्या मुख्य आरोपपत्रात म्हटले आहे.