दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेलांचा जमीन व्यवहार; ईडीकडून चौकशी

आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून तपास सुरु

Updated: Oct 13, 2019, 12:04 PM IST
दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेलांचा जमीन व्यवहार; ईडीकडून चौकशी title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : माजी नागरी विमान वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इमब्राहीमचा साथीदार इक्बाल मेमन उर्फ मिर्च याच्याशी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने हा तपास सुरु केला आहे. 

पटेल यांच्या कुटुंबीयांच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने इक्बाल मेमनला एक प्लॉट दिला होता. वरळीतील नेहरु तारांगण या प्राईम लोकेशन परिसरातील हा प्लॉट आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली सीजे हाऊस नावाची इमारत बांधली आहे. 

प्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित पटेल यांची कंपनी आणि इक्बाल मेमन यांच्यामध्ये एक करार झाला. त्यानुसार इमारतीच्या बदल्यात दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले. या दोन मजल्यांची किंमत जवळपास २०० कोटी रुपये आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीच्या भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना ईडकडून बोलावले जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई आणि बंगळुरुमध्ये ईडीने छापे टाकलेल्या अनेक छाप्यांमधून याप्रकरणाची कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. त्याआधारावर ईडीने ही चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या प्रकरणी पटेल कुटुंबीयांनी याप्रकरणात नाव आल्याने धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.